बजाज यांच्यावर एसीबीची धाड
By Admin | Published: September 26, 2015 02:52 AM2015-09-26T02:52:15+5:302015-09-26T02:52:15+5:30
सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्या जरीपटका येथील निवासस्थानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धाड टाकून झडती घेतली.
घर व कार्यालयाची घेतली झडती : सोसायटीच्या माध्यमातून लाखोंची माया जमविल्याची तक्रार
नागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्या जरीपटका येथील निवासस्थानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धाड टाकून झडती घेतली. दोन दिवस घेतलेल्या या झडती दरम्यान एसीबीला बजाज यांच्या निवासस्थान व कार्यालयातून १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख, ४८६ ग्राम सोने आणि ५.८२५ किलो चांदी सापडली. याशिवाय त्यांच्या घरातील फर्निचर व इतर सामान अशी एकूण संपत्ती ही २.७० कोटी रुपयाचा जवळपास गृहीत धरण्यात आली.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला काही दिवसांपूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती की, दीपक बजाज यांनी सोसायटीच्या माध्यमातून अनेक लोकांकडून लाचेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व चल अचल संपत्ती साठविली आहे. त्यांनी ही रक्कम व संपत्तीशी संबंधित दस्ताऐवज सिंधू एज्युकेशन सोसायटी परिसर, जरीपटका येथील निवासस्थान प्रिन्सिपल बंगलो, महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, के.सी. बजाज मार्ग जरीपटका येथे लपवून ठेवली आहे.
या गुप्त माहितीच्या आधारावर एसीबीने विशेष न्यायालयातून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ९३ अन्वये वॉरंट मिळविले. त्यानंतर २४ सप्टेंबरला कारवाई केली. ही झडती कारवाई शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेपर्यंत सुरू होती. दस्तऐवज व इतर वस्तूंच्या तपासणीनंतर एसीबीची चमू परतली.