लाचखोर मस्त, कारवाईत ‘एसीबी’ सुस्त; नागपूर विभागात प्रतिमहिना सरासरी पाचच कारवाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 07:30 AM2022-06-10T07:30:00+5:302022-06-10T07:30:01+5:30
Nagpur News लाचखोरीची कीड कायम असताना ‘एसीबी’च्या सापळा प्रकरणांमध्ये घट झाली आहे. विविध ठिकाणी लाचखोरी सुरू असतानादेखील ‘एसीबी’च्या कारवायांचा वेग का थंडावली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
योगेश पांडे
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर विभाग कार्यालयातर्फे २०२२ मधील पहिल्या १६० दिवसांत ३२ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. दर महिन्याची आकडेवारी सरासरी पाच इतकी होत आहे. मागील दोन वर्षांपासून सरासरी हीच आकडेवारी असून, पाच वर्षांअगोदर सापळ्यांची संख्या प्रतिमहिना दहाहून अधिक होती. लाचखोरीची कीड कायम असताना ‘एसीबी’च्या सापळा प्रकरणांमध्ये घट झाली आहे. विविध ठिकाणी लाचखोरी सुरू असतानादेखील ‘एसीबी’च्या कारवायांचा वेग का थंडावली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१८ पासून नागपूर विभागात एकूण ४०७ सापळे रचण्यात आले. सर्वाधिक लाचखोर २०१८ व २०१९ या वर्षातच अकडले. २०१८ मध्ये १२१ सापळे रचण्यात आले होते व १२६ गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर २०२० व २०२१ या दोन्ही वर्षी प्रत्येकी ७१ सापळे रचले गेले. १ जानेवारी २०२२ ते ९ जून २०२२ या कालावधीत नागपूर विभागात ‘एसीबी’तर्फे ३२ सापळे रचण्यात आले व तेवढेच गुन्हे दाखल झाले. यात ४२ जणांना अटक करण्यात आली. पाच वर्षांच्या आकडेवारीकडे नजर टाकली असता २०१९ नंतर कारवायांचा वेग संथ झाल्याचे दिसून येत आहे.
गोंदियात सर्वाधिक ‘ट्रॅप’
नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक जास्त नऊ सापळे रचण्यात आले. त्याखालोखाल गडचिरोतील सात व नागपूर - अमरावतीमध्ये प्रत्येकी सहा यशस्वी सापळे रचण्यात आले व त्यात लाचखोर अडकले.
मागील वर्षीच्या तुलनेत एका सापळ्याचीच घट
१ जानेवारी २०२२ ते ९ जून २०२२ या कालावधीत नागपूर विभागात ३२ यशस्वी सापळे रचण्यात आले. २०२१ मध्ये याच कालावधीत ३३ सापळ्यांत लाचखोर अडकले होते. २०२१च्या तुलनेत यंदा नागपूर व भंडाऱ्यात तीन प्रकरणे कमी असल्याचे दिसून आले.
मालमत्ता गोठविण्यासाठी एकच प्रस्ताव
नियमाप्रमाणे लाचखोरांची मालमत्ता गोठविण्यासाठी ‘एसीबी’कडून एकच प्रस्ताव गेला आहे. संबंधित प्रकरण परिवहन खात्याशी निगडीत होते.