एसीबीलाच भ्रष्टाचाराची कीड
By admin | Published: August 28, 2015 03:07 AM2015-08-28T03:07:58+5:302015-08-28T03:07:58+5:30
बत्तीस दातांच्या मध्ये राहून कर्तव्य बजावताना स्वत:ला जिभेसारखा सुरक्षित ठेवणारा विभाग म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभाग.
अनेक ट्रॅप फेल : वरिष्ठांकडून आॅपरेशनची तयारी
नरेश डोंगरे नागपूर
बत्तीस दातांच्या मध्ये राहून कर्तव्य बजावताना स्वत:ला जिभेसारखा सुरक्षित ठेवणारा विभाग म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभाग. शासकीय यंत्रणेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड दूर करण्याची जबाबदारी पेलणाऱ्या एसीबीच्या नागपूर युनिटला भ्रष्टाचाराची उधळी लागली आहे. परिणामी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध लावलेले अनेक सापळे ‘फेल‘ होत आहेत. या प्रकारामुळे एसीबीचे शीर्षस्थ कमालीचे अस्वस्थ झाले असून, आपल्याच कार्यालयातील दिव्याखालचा अंधार कसा दूर करायचा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
चार वर्षांपूर्वीपर्यंत एसीबी म्हणजे शासनाच्या इतर विभागाप्रमाणेच एक विभाग समजला जायचा. मात्र, नागपूर विभागाचे अधीक्षक म्हणून निशिथ मिश्र यांनी एसीबीची सूत्रे हाती घेतली. त्यांनी कारवाईची गती झपाट्याने वाढवली. प्रत्येक महिन्यात भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी पकडले जाऊ लागले. त्यामुळे भ्रष्ट यंत्रणेत खळबळ निर्माण झाली. मिश्र यांच्यानंतर प्रकाश जाधव यांनी एसीबीचे अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांनी कारवाईचा धडाका लावून एसीबीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न केला. परिणामी भ्रष्ट यंत्रणेला चांगलीच धडकी भरली. मात्र, याच कालावधीत एका आरटीओसह अन्य एका आरोपीकडून पाच लाखांची रक्कम उकळण्याचे एक प्रकरण पुढे आले. त्यामुळे एसीबीत प्रचंड खळबळ निर्माण झाली. अधीक्षक जाधव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठांना अहवाल पाठविला. ‘नॉन करप्ट आॅफिसर‘ म्हणून ओळख असलेले एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मांडवली करणाऱ्या त्या अधिकाऱ्याची तडकाफडकी नागपुरातून बदली केली. त्यानंतर जाधव यांनी येथे दक्षपणे काम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, एसीबी कार्यालयातील काहींना लाचखोरीची चटक लागल्यामुळे त्यांच्याही काळात अनेक ट्रॅप लिक झाले. दरम्यान, त्यांची येथून बदली झाली आणि राजीव जैन यांनी एसीबी युनिटचे अधीक्षक म्हणून १८ मे रोजी येथील सूत्रे हाती घेतली. त्यांनी या काळात चार डझन सापळे यशस्वी केले. मात्र, याच कालावधीत एसीबीतील काही भ्रष्ट प्रवृत्तीने सापळ्याची माहिती वेळोवेळी संबंधितांकडे पोहचविल्यामुळे डझनभर ‘ट्रॅप फेल‘ झाले आहे.
घरभेदी अनेक
प्रारंभी एक दोन प्रकरणात सापळे अयशस्वी झाल्यामुळे योगायोग समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, ट्रॅप फेल होण्याची सारखी पुनरावृत्ती होऊ लागल्यामुळे हा योगायोग नसून, घरभेदीपणा असल्याचे अधोरेखित झाले. त्याला चेक देण्यासाठी काही दिवसांपूर्वी भद्रावती पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर एसीबीची कारवाई करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक अशोक साखरकर यांचा समावेश होता. साखरकर काही दिवसांपूर्वीच एसीबीतून बदलून गेले होते. त्यांच्यावरील कारवाईमुळे ‘समविचारी घरभेदी‘ धडा घेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, घरभेद्यांवर त्याचा फारसा परिणाम न झाल्यामुळे जैन आणि त्यांच्या काही प्रामाणिक सहकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यात घरभेदी एक नव्हे तर अनेक असल्याची शंका बळावल्यामुळे अस्वस्थता अधिकच तीव्र झाली आहे. इस्पितळातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीच रोगग्रस्त व्हावे, तसा हा प्रकार असल्यामुळे त्याची शिर्षस्थ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली असून, भ्रष्टाचाराचा किडा नष्ट करण्यासाठी एसीबीच्या शिर्षस्थांनी एका वेगळ्या आॅपरेशनची तयारी सुरू केली आहे.