नागपूर जिल्हा परिषदेच्या सहायक लेखा अधिकाऱ्यावर एसीबीचा ट्रॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:29 PM2019-10-23T23:29:38+5:302019-10-23T23:33:18+5:30
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहा. लेखा अधिकारी सुदाम वामनराव पांगुळ (५४) यांना कार्यालयातच ४,५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहा. लेखा अधिकारी सुदाम वामनराव पांगुळ (५४) यांना कार्यालयातच ४,५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. एका कंत्राटदाराच्या बिलाची फाईल मंजूर करण्यासाठी पांगुळ यांनी पैशाची मागणी केली होती.
तक्रारकर्ते न्यू कैलासनगर येथील रहिवासी आहे. ते शासकीय कंत्राट घेऊन बांधकाम करतात. तक्रारकर्त्याने जिल्हा परिषदेच्या मौदा उपविभागांतर्गत एकूण नऊ कामे केली. तक्रारकर्त्याला मिळालेली नऊही कामे त्याने वेळेवर पूर्ण करून कामाच्या बिलाची फाईल जिल्हा परिषद नागपूर कार्यालयातील लेखा विभागाकडे पाठविली. या विभागात सहा. लेखा अधिकारी सुदाम पांगुळ हे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ही फाईल मंजुरीसाठी आली होती. परंतु या नऊ फाईलच्या मंजुरीसाठी पांगुळ यांनी तक्रारकर्त्यास लाच मागितली. सूत्रांच्या माहितीनुसार तक्रारकर्त्याने यापूर्वी पांगुळ यांनी लाचेच्या रूपात पैसेही दिले. पण पांगुळ आणखी पैसे मागत होते. पांगुळने पुन्हा तक्रारकर्त्यास ४,५०० रुपये मागितले. तक्रारदाराची वारंवार पैसे देण्यास इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप जगताप यांनी तक्रारीची गोपनीयरीत्या शहानिशा करून बुधवारी सापळा रचला. या सापळ्यात पांगुळ रंगेहात सापडले. पांगुळ यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांच्या घराची झाडाझडतीही अॅन्टीकरप्शन विभागाची चमू घेत आहे.
पांगुळ आहे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी
सुदाम पांगुळ हे जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचारी संघटनेच्या वरिष्ठ पदावर आहेत. संघटनेच्या बळावर चार वर्षांपूर्वी ते पं.स. मौदा येथून जि.प.च्या वित्त विभागात सहा. लेखा अधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. यापूर्वीही त्यांच्याविरोधात कंत्राटदारांच्या तक्रारी होत्या. एका विद्यमान आमदारांच्या जवळचे होते. राजकीय वरदहस्त असल्याने अधिकारीसुद्धा त्यांच्याकडून टेबल काढण्यास घाबरत होते. कंत्राटदारांशी मात्र त्यांची बिल मंजूर करण्यासाठी वारंवार तू तू मै मै होत होती. पांगुळला यापूर्वीही एका प्रकरणात निलंबित करण्यात आले होते, अशी सूत्रांची माहिती आहे.