नागपुरातील खासगी जमिनींवरील झोपडपट्टीवासीयांच्या पट्टेवाटपाला गती द्या; उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

By योगेश पांडे | Published: July 15, 2024 09:11 PM2024-07-15T21:11:42+5:302024-07-15T21:12:05+5:30

निवडणुकीअगोदर उपमुख्यमंत्री ‘ॲक्शन मोड’मध्ये, मनपाशी संबंधित विविध विकासकामांचा घेतला आढावा

Accelerate allotment of leases to slum dwellers on private lands in Nagpur; Instructions of the Deputy Chief Minister | नागपुरातील खासगी जमिनींवरील झोपडपट्टीवासीयांच्या पट्टेवाटपाला गती द्या; उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

नागपुरातील खासगी जमिनींवरील झोपडपट्टीवासीयांच्या पट्टेवाटपाला गती द्या; उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: उपराजधानीतील काही खासगी जमिनींवर अनेक वर्षांपासून झोपडपट्ट्या वसल्या आहेत. या झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. विधानसभा निवडणूक जवळ येत असताना त्यांनी मनपाशी संबंधित विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काम लवकरात लवकर करण्याची सूचना केली.

नागपूर शहरातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी जागेवरील झोपडपट्टीतील अतिक्रमणधारकांना स्थायी भाडेपट्टे देण्याबाबत मनपाद्वारे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे; मात्र काही ठिकाणी संथगतीने काम सुरू आहे. खासगी जागेवरील स्थायी भाडेपट्टा देण्याबाबत एक नियमावली तयार करावी व जागा शासन जमा करून ऑगस्ट २०२४ पर्यंत खासगी मालकीच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना भाडेपट्टा देण्याचे निर्देश त्यांनी दिले. खासगी जागेवर असलेल्या झोपडपट्टी नियमानुसार करण्यासाठी संबंधित जागेच्या मालकांना टीडीआर मोबदला देऊन संंबंधित जागा शासन जमा करावी अशी सूचना यावेळी त्यांनी केली.

या बैठकीला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, अजय चारठाणकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, उपायुक्त मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, कमलेश चव्हाण, राजेंद्र राठोड, रवींद्र बुंधाडे, अल्पना पाटणे, उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी इत्यादी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी आंबेडकर नगर, दंतेश्वरी नगर, गोपालनगर, प्रियंकावाडी, सहकार नगर, गुजरवाडी, रामटेकेनगर, रहाटे नगर टोली, राजीवनगर, चिंचभुवन शांतीनिकेतन येथील व इतर झोपडपट्ट्यांच्या संदर्भातील प्रक्रियेचा आढावा घेतला.

झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करणार

शासन निर्णयानुसार खाजगी जागेवरील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमित क्षेत्र घोषित झोपडपट्टी म्हणून संबोधले गेले असेल तर अशा खासगी जागेवरील झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप करण्यात येणार आहे. यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे झोपडपट्ट्यांचे सी.एफ.एस.डी., आर्चीनोव्हा आणि इमॅजिस या खासगी एजन्सीकडून पीटीएस व आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये २९८ घोषित आणि १२८ अघोषित अशा एकूण ४२६ झोपडपट्ट्या आहेत. या प्रक्रियेत नोटीस काढून नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात यावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

विकासकामांचीदेखील गती वाढवा

मागील काही महिन्यांपासून नागपुरातील अनेक विकासकामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. या कामांची गती वाढविण्याची सूचना फडणवीस यांनी केली. मनपाची तक्रार निवारण यंत्रणा गतिमान करण्यात यावी. तसेच गडरलाईनच्या समस्यांवर नागरिकांना दिलासा मिळावा व त्यांच्या समस्येचे समाधान व्हावे यादृष्टीने प्राधान्याने कार्य करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले. पावसाचे पाणी जमा होणाऱ्या भागांमध्ये प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या कामाचादेखील त्यांनी आढावा घेतला.

जनतेच्या ऐकून घेतल्या समस्या

दरम्यान, फडणवीस यांनी देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जनतेच्या विविध समस्यादेखील ऐकून घेतल्या. अनेक प्रकरणात संबंधित विभागांनी गंभीरतेने दखल घेण्याची सूचना त्यांनी केली.

Web Title: Accelerate allotment of leases to slum dwellers on private lands in Nagpur; Instructions of the Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.