सावनेरमध्ये काेराेना लसीकरणाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:09 AM2021-03-05T04:09:18+5:302021-03-05T04:09:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शहरातील आराेग्य प्रशिक्षण केंद्रावरील लसीकरण केंद्रात लस घेणाऱ्यांची गर्दी वाढत असून, लसीकरणाला गती मिळाली ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शहरातील आराेग्य प्रशिक्षण केंद्रावरील लसीकरण केंद्रात लस घेणाऱ्यांची गर्दी वाढत असून, लसीकरणाला गती मिळाली आहे. यात ज्येष्ठ नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आराेग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
काेराेना प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच शरीरातील राेगप्रतिकार शक्ती वाढवून काेराेना संसर्गाची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या दिशादर्शक सूचनेनुसार सर्वत्र लसीकरणाचे कार्य सुरू करण्यात आले आहे. ही माेहीम राबविताना कार्यरत फ्रंटलाईन वर्कर म्हणून महसूल अधिकारी, कर्मचारी, नगर प्रशासन अधिकारी, कर्मचारी, आराेग्य अधिकारी-कर्मचारी, आराेग्यसेविका, डाॅक्टर, आशावर्कर, पाेलीस विभाग आदींच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्णत्वास आले असून, आता ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील विशेष आजारग्रस्तांना लसीकरण सुरू आहे.
गुरुवारी (दि.४) १८२ महिला व पुरुषांना लस टाेचण्यात आली. तसेच आतापावेताे २,५३० नागरिकांना लस टाेचण्यात आली असल्याचे डाॅ. प्रीतम निचंत व डाॅ. संदीप गुजर यांनी सांगितले. लसीकरणाबाबत नागरिकात कमालीची उत्सुकता असून, ते स्वयंस्फूर्तीने केंद्रावर येऊन नाेंदणी करीत दिलेल्या वेळेत लसीकरण करवून घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डाॅ. जयस्वाल, आराेग्यसेवक धनराज देवके, यशवंत अत्रे, घनश्याम तुर्के, मंजुषा भगतवार, आरोग्यसेविका प्रतिभा लांजेवार आदी उपस्थित हाेते.