मेडिकलच्या यंत्र खरेदीला येणार वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:09 AM2021-09-18T04:09:00+5:302021-09-18T04:09:00+5:30
नागपूर : हाफकिन महामंडळाकडून यंत्र खरेदीच्या प्रक्रियेत लागणारा वेळ कमी करण्यासाठी व योग्य पद्धतीचे यंत्र खरेदी होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण ...
नागपूर : हाफकिन महामंडळाकडून यंत्र खरेदीच्या प्रक्रियेत लागणारा वेळ कमी करण्यासाठी व योग्य पद्धतीचे यंत्र खरेदी होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील चार मेडिकल कॉलेजवर ही जबाबदारी दिली आहे. यासंदर्भात लवकरच कॉलेजमधील विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक मुंबईला होणार आहे.
औषधी व वैद्यकीय उपकरणांचे दर आणि मानके यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी, दर्जा व गुणवत्ता सुधारण्यास मदत होण्यासाठी औषधे व यंत्रसामग्री खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने जुलै २०१७ रोजी घेतला. राज्यातील प्रत्येक मेडिकलला औषधे व साहित्य खरेदीचा त्यांचा निधी ‘हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉपोर्रेशन लिमिटेड’कडे वळता करण्याचे निर्देश दिले; परंतु मागील चार वर्षांचा राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजचा ‘हाफकिन’चा अनुभव समाधानकारक नाही. विशेषत: यंत्र खरेदीत होत असलेला उशीर, यंत्रामध्ये आवश्यक सोयींचा अभाव, यामुळे लाखो रुपयांचे यंत्र खरेदी होऊनही त्याचा वापर होत नसल्याचे पुढे आले आहे. याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी घेतली. राज्यातील चार मेडिकल कॉलेजकडे खरेदी प्रक्रियेत मदत करण्याची जबाबदारी दिली. यात नागपूर मेडिकल, औरंगबाद मेडिकल, मुंबईचे जे.जे. मेडिकल व पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजचा समावेश आहे.
-चार कॉलेजच्या प्रत्येक विभागाच्या प्रमुखाकडे जबाबदारी
निवड करण्यात आलेल्या चार मेडिकल कॉलेजमधील विविध विभागांच्या प्रमुखांकडे त्यांच्याशी संबंधित यंत्राच्या खरेदीत मदत करणार आहे. यासाठी संबंधित रुग्णालयाला यंत्राची गरज, त्याचा वापर व रुग्णांच्या उपचारात होणारी मदत आदी बाबी लक्षात घेऊन योग्य यंत्राची निवड करून हाफकिनकडे यंत्र खरेदीचा प्रस्ताव पाठविणार आहे.
-नागपूर मेडिकलमधील २३ कोटींचे यंत्रही लागणार मार्गी
नागपूर मेडिकलमध्ये मागील सात वर्षांपासून कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्ताव रेंगाळत चालला आहे. या रुग्णालयासाठी ‘लिनिअर एक्सिलेटर’ हे यंत्र खरेदीसाठी २३ कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. मेडिकल प्रशासनाने हा निधी हाफकिनचा खात्यात जमाही केला; परंतु तीन वर्षांचा कालावधी होऊनही यंत्राची खरेदी रखडलेली आहे; परंतु या नव्या समितीने या यंत्राची खरेदी मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.