रामटेक तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:45+5:302021-06-28T04:07:45+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांच्या काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. रामटेक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांच्या काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. रामटेक हा आदिवासीबहुल तालुका असल्याने या तालुक्यात लसीकरणाचा वेग वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांनी तालुक्यातील दुर्गम भागात जनजागृतीदरम्यान कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांनी या दाैऱ्यात रामटेक तालुक्यातील फुलझरी या पुनर्वसित गावासह संग्रामपूर, पुसदा -2, बेलदा व इतर गावे तसेच हिवराबाजार व करवाही प्राथमिक आराेग्य केंद्रांना भेटी देत आराेग्य, महसूल व पंचायत विभागातील कर्मचारी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियाेजन कसे करायचे याबाबत मार्गदर्शन केले.
काही ठिकाणी शिक्षकांना त्यांच्या कामात सुधार करण्याची ताकीद दिली तर, काही ठिकाणी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या चुका निदर्शनास आणून देत त्यांना सुधारण्याची सूचना याेगेश कुंभेजकर यांनी केल्या. बेलदा येथील आश्रमशाळा व करवाही प्राथमिक आराेग्य केंद्राच्या आवारात त्यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या मनातील कोराेना व लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले.
या दाैऱ्यात जिल्हा परिषद सदस्य, शांता कुंभरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेंद्र भुयार, उपकार्यकारी अधिकारी अनिल किटे, हेमके, खंडविकास अधिकारी प्रदीप बमनोटे, अशोक खाडे, तालुका आराेग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार, डॉ. गुप्ता, सभापती रवींद्र कुंभरे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सचिव, शिक्षक, आशासेविका, अंगणवाडी सेविका सहभागी झाले हाेते.
...
१,४७१ व्यक्तींचे लसीकरण
रामटेक तालुक्यात रविवारी (दि. २७) एकूण १,४७१ नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली. यावरून लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद स्पष्ट हाेताे. या लसीकरणाला तरुणांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन महिन्यात तालुक्यातील लसीकरणाचा वेग बराच मंदावला हाेता. तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रातर्गत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात लसींचा तुटवडा निर्माण हाेणार नाही, याची जिल्हा प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे.
....
लहान मुलांची काळजी घ्या
या दाैऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी याेगेश कुंभेजकर यांनी कर्मचाऱ्यांसह नागरिकांना काेराेना संक्रमणाची तिसरी लाट, नऊ प्रकारचे व्हीडीओ, काेराेना व म्युकरमायकाेसिस, या आजाराची लक्षणे, त्यापासून बचाव करण्याचे उपाय, औषधाेपचार याबाबत मार्गदर्शन केले. शिवाय, तिसऱ्या लाटेत घरातील लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.