ऑक्टोबरपासून स्मार्ट सिटीच्या कामास गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 09:26 PM2020-09-28T21:26:49+5:302020-09-28T21:28:02+5:30
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा,भांडेवाडीच्या १७३० एकर क्षेत्रात रस्त्याचे निर्माण सुरू केले आहे. ऑक्टोबरपासून या कामाला गती येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सोमवारी स्मार्ट अॅड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सिटी लेव्हल अॅडव्हायझरी फोरमच्या बैठकीत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पूर्व नागपुरातील पारडी, पुनापूर, भरतवाडा,भांडेवाडीच्या १७३० एकर क्षेत्रात रस्त्याचे निर्माण सुरू केले आहे. ऑक्टोबरपासून या कामाला गती येणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी सोमवारी स्मार्ट अॅड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सिटी लेव्हल अॅडव्हायझरी फोरमच्या बैठकीत दिली.
महापौर व स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाचे सदस्य संदीप जोशी यांच्या पुढाकाराने मनपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली. खासदार डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, माजी आमदार प्रकाश गजभिये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत डायगव्हाणे व सिटी अॅक्शन ग्रुपचे प्रमुख विवेक रानडे आदी उपस्थित होते.
मोरोणे यांनी सदस्यांसमोर स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. केंद्र शासनाने 'इंडिया सायकल्स फार चेंज चॅलेंज' उपक्रम सुरु केला आहे. नागपुरात सायकल चालविण्यायोग्य १८ कि.मी. रस्त्यांवरती डेडिकेटेड बायसिकल लेन तयार केला जात आहे. सीताबर्डी बाजारपेठेला व्हेईकल फ्री झोन करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे.
विकास महात्मे यांनी निरोगी राहण्यासाठी सगळयांनी सायकल चालविण्याचे आवाहन केले. कृष्णा खोपडे यांनी प्रकल्प बाधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. गिरीश व्यास यांनी नागपूरला क्राइम फ्री सिटी करण्याची सूचना केली. प्रकाश गजभिये यांनी नागपूर शहराच्या विकासाकडे लक्ष देण्याची सूचना केली.