तंत्रज्ञानारूप शिक्षण पद्धतीचा स्वीकार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 08:54 PM2017-11-18T20:54:44+5:302017-11-18T20:59:44+5:30

नागपुरातील नावलौकिक शाळा म्हणून हडस हायस्कूलची ओळख आहे. जगात तंत्रज्ञान बदलत आहे, त्याला अनुरूप अशा शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्याची गरज आहे. सध्या अनेक नव्या कंपन्या शहरात येत आहेत. यामुळे शैक्षणिक संस्थांसमोर तंत्रज्ञान अनुकूल मानवसंसाधन उभे करण्याचे आवाहन स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

Accept the Creative Education Method | तंत्रज्ञानारूप शिक्षण पद्धतीचा स्वीकार करा

तंत्रज्ञानारूप शिक्षण पद्धतीचा स्वीकार करा

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहननागपुरातील हडस हायस्कूलच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन


आॅनलाईन लोकमत

नागपूर : नागपुरातील नावलौकिक शाळा म्हणून हडस हायस्कूलची ओळख आहे. जगात तंत्रज्ञान बदलत आहे, त्याला अनुरूप अशा शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्याची गरज आहे. सध्या अनेक नव्या कंपन्या शहरात येत आहेत. यामुळे शैक्षणिक संस्थांसमोर तंत्रज्ञान अनुकूल मानवसंसाधन उभे करण्याचे आवाहन स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
लिबरल एज्युकेशन सोसायटीच्या हडस हायस्कूलला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित अमृत महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी शाळेच्या प्रांगणात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. व्यासपीठावर लिबरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष पी.व्ही. खांडेकर, सचिव डॉ. ए.पी. जोशी, व्ही.बी. सप्रे, के.बी. जोशी, हडस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सविता कुंडले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती बेंद्रे, सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता शुक्ल, कल्याणी शास्त्री, दीपा फडके आदी उपस्थित होते.
आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात हडस शाळेशी संबंध आलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील विशेषत: जिल्हा परिषदेच्या ६२ हजार शाळा डिजिटलायझेशन करून प्रगत झाल्या आहेत. मागील तीन वर्षांत शिक्षण क्षेत्रात केलेल्या व्यवस्थेमुळे राज्याचा क्रमांक १८ वरून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. नागपूर शहरात ‘टीसीएस’चे मोठे केंद्र सुरू होत असून ‘एरोस्पेस पार्क सुद्धा सुरू होत आहे. याचा लाभ घेण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करून त्या अनुरूप शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. हडस हायस्कूलसारख्या संस्था या बदलांचा स्वीकार करून एक आधुनिक संस्था म्हणून ओळख निर्माण करतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. हडस हायस्कूलतर्फे निर्माण होत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

शिक्षण संस्थांनी कौशल्ययुक्त विद्यार्थी घडवायला हवे

नितीन गडकरी म्हणाले, हडस प्राथमिक स्कूलचे संस्थापक हे सामान्य शिक्षक होते. हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. व्यावसायिकतेच्या दृष्टिकोनातून या शाळेची निर्मिती झाली नसून, त्यामागे शिक्षणाची तसेच त्यागाची भावना आहे. सद्यस्थितीला नागपूरमध्ये ३८ इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. येथे ४५० कोटी रुपयांचे ‘सिम्बॉसिस इन्स्टिट्यूट’चे काम सुरू झाले आहे. योगगुरू बाबा रामदेव हे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. नागपुरात मोठे उद्योग येत आहते. या नवनवीन उद्योगधंद्यांमुळे स्थानिकांना निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. उद्योगांना सक्षम मनुष्यबळ पुरविण्यासाठी शिक्षण संस्थांनी उत्तम कौशल्ययुक्त विद्यार्थी तयार केले पाहिजे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे शिक्षण द्यावे, असेही ते म्हणाले.

शैक्षणिक संस्थांचा विकासही आवश्यक

डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, पोषक वातावरण असणे आवश्यक आहे. गुणवंत विद्यार्थी घडविण्यासोबतच नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणेही गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक डॉ. ए.पी. जोशी यांनी केले. संचालन अश्विनी खरे-पिंपळापुरे व भक्ती बर्वे यांनी तर आभार कल्याणी शास्त्री यांनी मानले. कार्यक्रमात ‘अमृतगाथा’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात स्मरणिका पालखीतून सभा मंडपात आणण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत माजी विद्यार्थी उपस्थित होते.

 

Web Title: Accept the Creative Education Method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.