सहकार क्षेत्राने तंत्रज्ञानातील बदल स्वीकारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:41 AM2017-10-27T01:41:34+5:302017-10-27T01:41:51+5:30

Accept technological changes in Co-operative sector | सहकार क्षेत्राने तंत्रज्ञानातील बदल स्वीकारावा

सहकार क्षेत्राने तंत्रज्ञानातील बदल स्वीकारावा

Next
ठळक मुद्देशेखर चरेगांवकर : सहकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकांनी एकत्र येऊन काम करणे म्हणजे सहकार. सहकारी संस्थांना एनपीए सक्तीचे केले त्यावेळी या क्षेत्रातील लोक संभ्रमावस्थेत होते. आयकर कायदा आणि जीएसटी संदर्भातही हीच स्थिती आहे. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तू कमी झाल्या आहेत. सहकार कायद्यात वेळोवेळी होणाºया बदलांमुळे संचालक व सभासदांना भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. बदलत्या तंत्रज्ञानाचा सहकार क्षेत्राने सकारात्मक दृष्टीने स्वीकार करावा, असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी येथे व्यक्त केले.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नागपूर आणि सहकार भारती नागपूरच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सहकारी परिषदेचे आयोजन गांधीसागर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात गुरुवारी करण्यात आले. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, समृद्धी सहकारी बँक लि. नागपूरच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मुकुंदराव तापकीर, संघटन मंत्री नीळकंठ देवांगण, विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संस्था मर्या.
नागपूरचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, नागपूर जिल्हा सहकारी पतसंस्था, नागपूरचे अध्यक्ष राजेंद्र घाटे, सहकारी संस्था नागपूरचे जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, सहकार भारती विदर्भचे प्रकोष्ठ प्रमुख मनोज पांडे उपस्थित होते.
सहकार चळवळीला
गतवैभव प्राप्त व्हावे
चरेगावकर म्हणाले, ९७ व्या घटनादुरुस्तीत सहकाराला स्वायत्तता द्या, व्यावसायिकता आणा आणि लोकशाहीने नियंत्रण आणण्याचा सूचना केल्या आहेत. जे सभासद प्रश्न विचारतात ते विरोधक होतात. तर दुसरीकडे सभासद पतसंस्थेचे मालक आहेत, असे अध्यक्ष सांगतात. हा विरोधाभास आहे. समाजाचा सहकारावर विश्वास आहे. सभासद व संचालकांना प्रशिक्षण देण्यासाठी संगणक साक्षरता विभाग बनवावा लागेल. राज्यातील १७ हजार पतसंस्थांमध्ये लोकांच्या ५९ हजार कोटींच्या ठेवी आहेत. सहकारी संस्थांचा नफा सभासदांमध्ये वाटला जातो. पण पतसंस्था, दूध डेअरी असो वा साखर कारखाने, यांचे वय वाढल्यामुळे आजार जडले. सहकार चळवळ समाजाचा विश्वास संपादन करण्यास कमी पडली. नागरी बँकांचे विश्वस्त न राहता मालक झाले आणि बँकांना गालबोट लागले. मोठे उद्योजक समाजाच्या पैशावर खासगी उद्योग चालवितात. मग सहकार चळवळ का नाही? असा सवाल करीत त्यांनी सहकार चळवळीतील मरगळ दूर करून गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज असल्याचे सांगितले.
कांचन गडकरी यांनी महिला बचत गटांना सक्षम करून त्यांना सोयीसुविधा पुरविण्याचे आवाहन केले. महिलांचा सहकारात सहभाग कसा राहील, यावर त्यांनी भाष्य केले.
संचालन सहकार भारतीचे विदर्भ प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी केले तर सहकार भारती नागपूरचे अध्यक्ष भरत महाशब्दे यांनी आभार मानले. समापन मंत्र अंजली मुळे यांनी म्हटला.
परिषदेत नागपुरातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Accept technological changes in Co-operative sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.