स्वीकार करताना, समजून घेताना पुरावे तपासणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:09 AM2021-09-21T04:09:33+5:302021-09-21T04:09:33+5:30
- स्वामी श्री. एम. : ‘अस्तित्व, अध्यात्म आणि तप’ विषयावर व्याख्यान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रत्येक गोष्टींसाठी प्रमाण ...
- स्वामी श्री. एम. : ‘अस्तित्व, अध्यात्म आणि तप’ विषयावर व्याख्यान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक गोष्टींसाठी प्रमाण अर्थात पुराव्यांची गरज असते. प्रमाण असतील तर स्वीकारणे आणि समजून घेणे शक्य होत असल्याचे मत आध्यात्मिक गुरू, समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि वक्ता श्री. एम. यांनी व्यक्त केले.
मंथनच्या वतीने सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये आयोजित व्याख्यानात ते ‘स्वत:चे अस्तित्त्व, अध्यात्म आणि तप’ या विषयावर बोलत होते. श्री. एम. यांचा जन्म केरळ येथील तिरुअनंतपुरम येथील एका मुस्लिम कुटुंबात झाला. बाल्यावस्थेपासून ते एका योग्यापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांनी यावेळी सांगितला.
तुमच्यात सामर्थ्य असेल तर तुम्ही जे काही आरंभ करता ते ध्येयपूर्तीपर्यंत जाते. मात्र, या प्रवासात अनेक चढ-उतार असतील, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या प्रवासात उतार, अपयश दिसताच जरा थांबणे, विश्लेषण करणे आणि पुन्हा सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. भिन्न व्यक्ती भिन्न भिन्न समस्यांनी ग्रस्त आहेत. मात्र, त्यांच्या समस्यांमुळे त्यांना खचू न देताना त्यांना पुन: प्रवाहात आणावे, असे आवाहन श्री. एम. यांनी यावेळी केले. कार्यक्रमात श्री. एम. यांनी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली. तुम्ही एखादा मार्ग सोडला तर तो का सोडला किंवा त्या मार्गावरचा आनंद तुम्हाला वेगळ्याने कसा प्राप्त झाला, ही गोष्ट समजावून सांगता आली पाहिजे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की संन्यासी बनल्यानेच आध्यात्मिक होता येत नाही तर आध्यात्मिक मार्ग कसाही प्राप्त करता येऊ शकतो. त्यासाठी एक थांबा आवश्यक असतो. दररोजच्या कर्मातून काही वेळेची विश्रांती आणि विश्लेषण तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाते, असे ते यावेळी म्हणाले. तत्पूर्वी, मंथनचे समन्वयक सतीश सारडा यांनी प्रास्ताविक केले. प्रश्नोत्तराच्या सत्राचे समन्वयन रोहन पारेख यांनी केले. निवेदन अंकिता देशकर यांनी केले.
-------------------
केरळमध्ये आता सांप्रदायिक सौहार्द्र
केरळमध्ये आता सांप्रदायिक सौहार्द्र निर्माण झाले असून, राजकीय विचारधारा संसदेसाठी असून हिंसाचारासाठी नव्हे, असे श्री. एम. खासगीमध्ये झालेल्या चर्चेत म्हणाले. राजकीय हिंसा रोखण्यासाठी तरुणांची मोठी भूमिका महत्त्वाची आहे. केरळमध्ये पूर्वी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रक्तपात घडला होता. हा हिंसाचार रोखण्यासाठी मला मध्यस्थी करावी लागली आणि दोन्हींकडून यासाठी पुढाकार घेतला गेला. आता तेथे सामाजिक सौहार्द्र नांदत असल्याचे श्री. एम. म्हणाले.
............