नागपुरातील चिंचभवन पुलावर अपघात : आजी-नातवासह तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:36 PM2019-06-12T22:36:45+5:302019-06-12T22:37:24+5:30
दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात आजी व नातवासह तिघांचा मृत्यू झाला. १८ तासाच्या आत झालेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आजी व नातवला चिरडणाऱ्या वाहनाचा पत्ता न लागल्यामुळे नातेवाईकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात आजी व नातवासह तिघांचा मृत्यू झाला. १८ तासाच्या आत झालेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. आजी व नातवला चिरडणाऱ्या वाहनाचा पत्ता न लागल्यामुळे नातेवाईकांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे.
पहिला अपघात बुधवारी दुपारी १.४५ च्या सुमारास वर्धा रोडवरील चिंचभवन पुलाजवळ घडला. इंदू काशीनाथ खोडे (७०) त्यांचा नातू इशांत नारायणराव खोडे (१६) रा. काचुरे ले-आऊट चिंचभवन अशी मृतांची नावे आहे. तसेच आदित्य रामभाऊ निंबाळकर (२०) रा.एमआयजी कॉलनी, त्रिमूर्तीनगर हा जखमी आहे. तिघेही अॅक्टीव्हाने (एमएच/३१/ईडब्ल्यू/३८३१) चिंचभवनकडे जात होते. आदित्य गाडी चालवित होता. त्याच्या मागे इशांत आणि त्याची आजी इंदू हे बसले होते. चिंचभवन पुलाजवळ अज्ञात वाहनाने अॅक्टीव्हाला जोरदार धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. वाहनाच्या चाकात आल्याने इंशात व इंदू यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुपारची वेळ असल्याने पुलावर वर्दळही कमी होती. पोलिसांनी घटनास्थळी जमलेल्या लोकांना विचारपूस केली. त्यांच्याकडून धडक देणारे वाहन ट्रक किंवा ट्रेलर असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी खोडे कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती होताच खोडे कुटुंबात शोक पसरला. त्यांनी आरोपी वाहन चालकाचा पत्ता लावून त्याला तातडीने अटक करण्याची मागणी केली. सोनेगाव पेलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. चिंचभवन पुलावर सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनाही वाहनाचा शोध लावण्यात अडचण येत आहे. परंतु या रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आहे. त्याच्या मदतीने आरोपी वाहन चालकाचा शोध घेता येऊ शकतो, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
चिंचभवन परिसरात नेहमीच अपघात होत असतात. ते रोखण्यसाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी वेळोवेळी केली जाते. परंतु यादृष्टीने ठोस पाऊल उचलण्यात आले नसल्याने अपघात कमी होताना दिसून येत नाही. जखमी आदित्यची प्रकृतीही चिंताजनक आहे.
दुसरा अपघात मंगळवारी रात्री कळमना येथील डिप्टी सिग्नलजवळ घडला. गुलमोहरनगर येथील रहिवासी ३७ वर्षीय सुरेश आसाराम पटले बाईकने डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंगजवळून जात होता. त्याला ट्रक क्रमाक आर.जे. ०७ जी.डी. ४९६४ ने धडक दिली. जखमी सुरेशला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.