नागपूर-भंडारा रोडवर भीषण अपघात; चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 10:41 AM2020-02-15T10:41:11+5:302020-02-15T16:21:17+5:30

नागपूर भंडारा मार्गावर असलेल्या मौदाजवळ शनिवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरला एका ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली.

Accident on Nagpur-Bhandara Road; Four killed | नागपूर-भंडारा रोडवर भीषण अपघात; चार ठार

नागपूर-भंडारा रोडवर भीषण अपघात; चार ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लग्न सोहळा आटोपून नागपूरकडे व-हाड घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) उभ्या कंटेनरवर आदळल्याने ४ ठार तर १३ व-हाडी जबर जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शनिवारी पहाटे ४. ४५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. अपघातात ठार झालेल्यामध्ये वराच्या आजीचा देखिल समावेश आहे. या भीषण अपघाताने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे. 
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस शिपायी अमित प्रवीण झिलपे यांचा विवाह सोहळा शुक्रवारी रात्री गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे पार पडला. वर-वधूला घेऊन त्यांचे नातेवाईक आणि व-हाडी मंडळी ट्रॅव्हल्सने (एमएच ३१/ सीक्यू ८५४८) ने पहाटे २. ३० ला नागपूरकडे निघाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून बस वेगात नागपूरकडे येत होती. मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगोरी गावाजवळ एक कंटेनर (एमएच ४९/ एटी ३८५५) उभा होता. वेगात असलेली बस कंटेनरवर आदळली. त्यामुळे बसमध्ये असलेल्या वराच्या आजी  विठाबाई तुकाराम झिलपे (वय ७२), करुणा विजय खोंडे (वय ५८), आनंद रमेश आठवले (वय २८, सर्व रा. नागपूर) आणि सतीश जांभुळकर (वय ३५, रा. गोंदिया) या चौघांचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ३० ते ३५ प्रवासी होते. त्यातील  १३ प्रवासी जबर जखमी झाले.  
ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी बहुतांश व-हाडी साखरझोपेत होती. अपघातानंतर मोठा आवाज होऊन जोरदार धक्का लागल्याने प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. एकमेकांच्या अंगावर पडल्याने नेमके काय झाले, हे काही क्षण अनेकांना कळलेच नाही. नंतर अपघात घडल्याचे लक्षात आले. वर अमित यांचे काका अरविंद तुकाराम झिलपे (वय ४९) हे नागपूरला पोलीस हवालदार आहेत. ते गुन्हेशाखेत सेवारत आहेत. त्यांनी तसेच सोबतच्या मंडळींनी लगेच १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना अपघाताची माहिती कळवली.
अवघा गावच मदतीला धावला
अपघातामुळे एवढा मोठा आवाज झाला की सिंगोरीवासियांची झोपच उडाली. गावक-यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक रोखली गेली. दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. 

त्यामुळे अपघातग्रस्तांच्या मदतीला आलेले भंडारा अन् मौदा पोलीस तसेच अ‍ॅम्बुलन्सही वाहनांच्या गर्दीत अडकली. बराच वेळ ईकडे तिकडे केल्यानंतर अ‍ॅम्बुलन्स डाव्या बाजुने काढून जखमीजवळ पोहचवण्यात आली. त्यानंतर तीन अ‍ॅम्बुलन्स मध्ये जखमींना आधी भंडारा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तर अन्य दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना नागपूरला पाठविण्यात आले. मेयोतील डॉक्टरांनी येथे आणलेल्यांपैकी दोघांना मृत घोषित केले. 

बसचालक पळाला
हा अपघात एवढा भीषण होता की बसची डावी बाजू कंटेनरमुळे कापत गेली. अपघातानंतर निर्माण झालेल्या गोंधळात बसचालक खाली उडी मारून पळून गेला. दुपारी २. ३० वाजेपर्यंत तो कुठे गेला, कसा आहे, त्याबाबत पोलीस माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. या अपघाताचे कारण स्पष्ट झाले नाही. बसचालक दारूच्या नशेत होता का, ते देखिल स्पष्ट झाले नाही. मात्र, त्याला झपकी आली असावी अन् त्यामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज आहे. 
 

Web Title: Accident on Nagpur-Bhandara Road; Four killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात