समुपदेशनातून रोखणार समृद्धी महामार्गावरील अपघात
By सुमेध वाघमार | Published: March 21, 2023 05:57 PM2023-03-21T17:57:33+5:302023-03-21T17:57:54+5:30
आतापर्यंत ३१ प्राणांतिक अपघात : नागपूर ते शिर्डी मार्गावर ८ समुपदेशन केंद्रे
नागपूर :समृद्धी महामार्गावर तीन महिन्यांत ३१ प्राणांतिक अपघात झाले. वाढते अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांचे सक्तीने समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूर ते शिर्डी मार्गावर ८ समुपदेशन केंद्र उभारले जाईल. मंगळवारी नागपुरात परिवहन खाते व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे व उपाययोजनांसाठी परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी सोमवारी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. मंगळवारी कळसकर यांनी आरटीओ अधिकारी आणि ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. यात येत्या सात दिवसांत ‘एमएसआरडीसी’ला प्रत्येक जिल्ह्यात एक प्रमाणे नागपूर ते शिर्डी दरम्यान ८ समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा सूचना केल्या. अतिवेगाने वाहन चालवणाऱ्यांना सक्तीने रोखून या केंद्रावर आणून ३० मिनिटे ते १ तास आरटीओकडून समुपदेशन केले जाईल.