आपत्ती व्यवस्थापनासाठी सेंट्रल रेल्वेची अक्सिडेंट रिलिफ ट्रेन सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:53 AM2024-09-13T10:53:30+5:302024-09-13T10:54:01+5:30
Nagpur : वर्ध्यानंतर आता बल्लारशाह सेंटर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्लॅक गोल्डच्या पट्ट्यात आपत्ती व्यवस्थापन बळकट तसेच तत्पर करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर विभागातील बल्लारशाह येथे अक्सिडेंट रिलिफ ट्रेन (एआरटी व्हॅन) तैनात करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणजे बल्लारशाह रेल्वे स्थानक होय. बल्लारशाह स्थानकावर एकीकडे मध्य रेल्वेचे शेवटचे टोक आहे तर दुसरीकडे दक्षिणेकडील सुरुवात आहे. या स्थानकावरून प्रवाशांसोबतच मालवाहतुकीतूनही मोठा महसूल मिळतो. येथून कोळसा, लोह आणि इतर खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. अर्थात बल्लारशाह स्थानकावरून मालगाड्यांची मोठी वर्दळ असते. पॉवर प्लान्ट, अनेक कोळसा खाणी आणि लोह खनिजांची येथून लोडिंग होते. त्यामुळे सुरक्षेचे कडक प्रोटोकॉलसुद्धा या स्थानकावर आहे. तरीसुद्धा कोणत्या न कोणत्या चुकीमुळे कुठल्या ना कुठल्या साईडिंगवर अपघात होतो. अशावेळी तेथे तात्काळ मदत पोहोचवता यावी म्हणून सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेली एआरटी व्हॅन तयार केली आहे. ही व्हॅन आता बल्लारशाह स्थानकावर तैनात करण्यात आली. यामुळे आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत पोहोचविणे शक्य होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे मत आहे.
म्हणून झाली व्यवस्था!
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सेंटर यापूर्वी वर्धा येथे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेली एआरटी व्हॅन तैनात करण्यात आली आहे. मात्र, बल्लारशाह किंवा आसपासच्या साईडवर कोणती आकस्मिक घटना घडली तर वर्धा तेथून १३२ किलोमीटर दूर अंतरावर आहे. त्यामुळे या ट्रेनला तेथे पोहोचण्यास ३ ते ४ तासांचा अवधी लागतो. अशा वेळी आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहोचू शकत नाही. ही बाब काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेवरून लक्षात आली. म्हणून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी तात्काळ मदतीसाठी हे मोबाइल एआरटी युनिट आता बल्लारशाह येथे तैनात केले आहे.