‘भूगाव गाल्वा मेटॅलिक’ला ‘टेकओव्हर’ केल्यावर महिनाभरातच अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 10:30 AM2021-02-04T10:30:17+5:302021-02-04T10:31:27+5:30
Nagpur News जानेवारी महिन्यातच ‘युके’स्थित स्टील गुंतवणूकदार निथिआ कॅपिटल आणि अमेरिकेतील ‘कॅरव्हाल इन्व्हेस्टर्स’तर्फे ‘वर्धा स्टील होल्डिंग प्रा.लि.’ या कंपनीच्या माध्यमातून ’भूगाव गाल्वा मेटॅलिक लि.’या कंपनीला ‘टेकओव्हर’ करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा जिल्ह्यातील ‘मेटॅलिक’ फॅक्टरीत स्फोट झाल्याची घटना घडली. वार्षिक ‘मेन्टेनन्स’साठी ‘फर्नेस’ बंद केले असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यातच ‘युके’स्थित स्टील गुंतवणूकदार निथिआ कॅपिटल आणि अमेरिकेतील ‘कॅरव्हाल इन्व्हेस्टर्स’तर्फे ‘वर्धा स्टील होल्डिंग प्रा.लि.’ या कंपनीच्या माध्यमातून ’भूगाव गाल्वा मेटॅलिक लि.’या कंपनीला ‘टेकओव्हर’ करण्यात आले. मात्र या प्रक्रियेदरम्यानदेखील आक्षेप उपस्थित करण्यात आले होते. आता कार्यभार हाती घेतल्यानंतर महिनाभरातच असा अपघात झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
‘उत्तम गाल्वा स्टील्स’ आणि ‘उत्तम गाल्मा मेटॅलिक्स’ या दोन्ही कंपन्यांची दिवाळखोरीची प्रक्रिया मे आणि जुलै २०१८ मध्ये सुरू झाली होती. या दोन्ही कंपन्यांवर अनुक्रमे ४,१७६ कोटी व ३,०१४ कोटींचे दावे होते. दोन्ही कंपन्या ‘आरबीआय’च्या ‘कॉर्पोरेट डिफॉल्टर्स’च्या यादीत होत्या. या कंपन्यांच्या लिलाव प्रक्रियेत निथीआ कॅपिटल, ‘कॅरव्हॅल इन्व्हेस्टर्स’ यांच्यासह हॉंगकॉंग येथील ‘एसएसजी कॅपिटल मॅनेजमेन्ट’, सज्जन जिंदाल यांच्या ‘जेएसडब्ल्यू स्टील्स’ यांच्यासह मोठ्या कंपन्यांनी सुरुवातीला रुची दाखविली होती. ‘कॅरव्हॅल’ व ‘निथिआ’च्या प्रस्तावअर्जाला ‘सीओसी’तर्फे (कमिटी ऑफ क्रेडिटर्स) एप्रिल २०१९ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. मात्र ‘एसएसजी कॅपिटल’ने यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर ‘एनसीएलटी’ने (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) ‘कॅरव्हॅल इन्व्हेस्टर्स’ व ‘निथिआ कॅपिटल’च्या प्रस्ताव अर्जांना मान्यता दिली. महिनाभरापूर्वीच दोन्ही कंपन्यांनी सिंगापूर स्थित ‘जॉईन्ट व्हेंटर होल्डिंग कंपनी’ असलेल्या ‘वर्धा स्टील होल्डिंग प्रा.लि.’च्या माध्यमातून २ हजार कोटींमध्ये खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. अर्धवट पूर्ण असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करून उत्पादन क्षमता ५० टक्क्यांनी वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे ‘टेकओव्हर’नंतर स्पष्ट करण्यात आले होते.
कामाला गती मिळण्याचे दावे करण्यात येत असतानाच महिनाभरातच अशा पद्धतीने अपघात झाला आहे. या अपघातामुळे उद्योग व कामगार वर्तुळात विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.