नागपूर जिल्ह्यात चार वर्षांत २७८ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 08:26 PM2019-08-26T20:26:03+5:302019-08-26T20:27:36+5:30
गेल्या चार वर्षात नागपूर जिल्ह्यात २७८ विद्यार्थ्यांचा मत्यू झाला असून, या योजनेंतर्गत २ कोटी ३० लाख रुपयांची भरपाई विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघातामुळे विद्यार्थ्यांना पोहचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्यासाठी राज्य सरकार राजीव गांधी विद्यार्थीअपघात सानुग्रह योजना राबवीत आहे. गेल्या चार वर्षात नागपूर जिल्ह्यात २७८ विद्यार्थ्यांचा मत्यू झाला असून, या योजनेंतर्गत २ कोटी ३० लाख रुपयांची भरपाई विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आली आहे.
वर्ग १ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते. पूर्वी ही योजना विमा कंपन्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत होती. परंतु विमा कंपन्यांच्या वर्तनाबद्दल शासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विमा कंपन्या विविध कारणे सांगून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत होती. विद्यार्थ्यांच्या अपघाताचे दावे लवकर निकाली लागत नसल्यामुळे, विमा कंपन्यांमार्फत योजना बंद करून त्याऐवजी सानुग्रह अनुदान योजना २०१२-१३ पासून राबविण्यात आली. संर्पदंश, विषबाधा, विजेचा शॉक, अपघात आदीमध्ये विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याला ७५,००० रुपये भरपाई देण्यात येते. अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास ५०,००० व एक डोळा एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रुपये भरपाई देण्यात येते. योजनेची भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी माध्यमिक हे सदस्य आहेत, तर शिक्षणाधिकारी प्राथमिक हे सदस्य सचिव आहेत. विद्यार्थ्यांना सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचे पालक व शाळेच्या मुख्याध्यापकांची आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षात २७८ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आले आहेत. त्यांच्या नुकसान भरपाईपोटी २ कोटी ३० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
वर्षनिहाय नुकसान भरपाई
वर्ष विद्यार्थी संख्या नुकसान भरपाई
२०१४-१५ ६५ ४४,२५,०००
२०१५-१६ ६२ ४६,५०,०००
२०१७-१८ ४८ ३६,००,०००
२०१८-१९ १०३ ७७,२५,०००