नागपुरात अभियंत्याचा आकस्मिक मृत्यू; ऑनलाईन मागवलेल्या सामिष भोजनाबाबत साशंकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:42 PM2020-04-27T22:42:44+5:302020-04-27T22:43:57+5:30
ऑनलाईन चिकन मागवून खाल्ल्यानंतर काही वेळातच एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाईन चिकन मागवून खाल्ल्यानंतर काही वेळातच एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.
विराज नरेंद्र ताकसांडे असे मृताचे नाव आहे. विराज सॉफ्टवेअर इंजिनियर होता. त्याची स्वत:ची कंपनी त्याने निर्माण केली होती. त्याचे आई-वडील कुटुंबीय मनीषनगरात राहतात. तर तो त्याची पत्नी पूजा हिच्यासह लक्ष्मीनगरातील आठ रस्ता चौकात असलेल्या अभिनवअपार्टमेंटमध्ये राहायचा.
शनिवारी रात्री ८ च्या सुमारास बजाजनगरातील एका हॉटेलमधून विराजने ऑनलाईन शेजवान चिकन मागविले. ९ वाजताच्या सुमारास पती-पत्नीने चिकन राईस आणि नूडल्स खाल्ले. त्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागले. तो बाथरूमला गेला आणि परत आला तेव्हा त्याला दरदरून घाम फुटला होता. पत्नीने लगेच त्याच्या मित्रांना फोन करून बोलवून घेतले. मित्र आल्यानंतर विराजसह सर्वजण ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्याची प्रकृती बघून तेथील डॉक्टरांनी बजाजनगर पोलिसांना कळविले आणि विराजला मेडिकलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. पोलिसांच्या समोरच विराजला मेडिकलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी विराजला तपासून मृत घोषित केले. यावेळी रात्रीचे ११ वाजले होते. विराजच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि डॉक्टरांनी विराजची कोरोना टेस्ट करून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा अहवाल सोमवारी रात्रीपर्यंत पोलिसांना मिळाला नव्हता. सोमवारी अहवाल मिळेल आणि त्यानंतर पुढचे ठरविण्यात येईल, असे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान विराजचा मृत्यू फूड पॉयझनिंगमुळे झाला की आणखी कशामुळे, त्यासंदर्भात उलटसुलट चर्चा आहे. त्याने मागविलेले ऑनलाईन चिकन आणि राईस पत्नीनेही सोबतच खाल्ले. मात्र तिच्या प्रकृतीवर त्याचा काहीही परिणाम नाही झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू चिकन खाल्ल्यामुळेच झाला की अन्य दुसरे कोणते कारण आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लठ्ठपणावर सुरू होते उपचार
यासंदर्भात माहिती देताना ठाणेदार क्षीरसागर यांनी सांगितले की, विराज हा लठ्ठ होता. त्याचे वजन १२० किलोपेक्षा जास्त होते. काही महिन्यांपूर्वी त्याच्या मांडी, पोटरीतील रक्त गोठल्यामुळे त्याला त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यावर उपचार सुरू केले होते.