शिक्षकाचा अपघाती मृत्यू; तरुण गंभीर जखमी; ट्रकची कारला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 10:16 PM2022-02-12T22:16:36+5:302022-02-12T22:17:08+5:30
Nagpur News नागपूरहून उमरेडकडे कारने येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची कारला जाेरात धडक लागली. यात शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला.
नागपूर : नागपूरहून उमरेडकडे कारने येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकची कारला जाेरात धडक लागली. यात शिक्षकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला. अपघाताची ही घटना उमरेड वेकाेलि पिकनिक स्पाॅट परिसरात महामार्गावर शनिवारी (दि.१२) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
विनोद शंकर महाजन (४८, भांडारकर ले-आउट, उमरेड) असे मृत शिक्षकाचे नाव असून, त्यांच्यासाेबत असलेला त्यांचा मित्र हर्षल नथ्थूजी तरणकर (२५, रेवतकर ले-आउट, उमरेड) हा गंभीर जखमी झाला आहे. नागपूर येथून एमएच-४०/बीजे-२७८९ क्रमांकाच्या कारने विनोद महाजन आणि हर्षल तरणकर उमरेडकडे निघाले होते. कार हर्षल चालवीत होता. दरम्यान, वेकोलि पिकनिक स्पॉट परिसरात समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या एमएच-४०/वाय-२७९७ क्रमांकाच्या ट्रकची कारला जबर धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने विनोद महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. हर्षल तरणकर याला डोक्याला, कमरेला गंभीररीत्या दुखापत झाली असून, त्याला उपचारार्थ नागपूरला रवाना करण्यात आले.
ट्रकच्या धडकेत कारच्या समाेरील भागाचा चुराडा झाला हाेता. काचाही फुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. मृत विनोद महाजन हे भिसी (ता. चिमूर) येथील मूळ रहिवासी असून उमरेड येथे वास्तव्यास होते. नागभिड पंचायत समितीअंतर्गतच्या पेंढरी बरड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या, रविवारी सकाळी ११ वाजता कुही मार्गावरील आमनदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे करीत आहेत.
मुलासोबत अखेरची भेट
विनोद महाजन यांचा मुलगा साहील हा इयत्ता बारावीला शिक्षण घेत आहे. नागपूर येथे एका हाॅस्टेलमध्ये तो असून शनिवारी काही कामासह साहीलची भेट घेऊन विनोद उमरेडकडे रवाना झाले होते. अशातच त्यांचा मृत्यू झाल्याने मुलासोबतची ‘ती’ भेट अखेरची ठरली. विविध उपक्रम-कार्यक्रमात विनोद सक्रिय होते. त्यांच्या सुस्वभावामुळे ते परिचित होते. अचानक मृत्यूच्या घटनेने कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवाराला धक्का बसला.