मुख्याध्यापकांचा अपघाती मृत्यू; ट्रकची माेटरसायकलला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 07:55 PM2022-10-15T19:55:26+5:302022-10-15T19:55:57+5:30
Nagpur News भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
नागपूर : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुख्याध्यापकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ते सालई (ता. रामटेक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत हाेते. ही घटना रामटेक-हिवराबाजार मार्गावरील नवेगाव (पुसदा पुनर्वसन) शिवारात शनिवारी (दि. १५) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
विश्वनाथ कुंभलकर (४०, रा. हिवराबाजार, ता. रामटेक) असे मृताचे नाव आहे. ते सालई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत हाेते. शिवाय, तीन महिन्यांपासून ते रामटेक शहरात राहायचे. शनिवारी सकाळची शाळा असल्याने ते नेहमीप्रमाणे एमएच-४०/एस-२१५८ क्रमांकाच्या माेटरसायकलने रामटेकहून हिवराबाजार मार्गे सालई येथे जायला निघाले. नवेगाव (पुसदा पुनर्वसन) शिवारात विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच-३१/सीडी-५७५६ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली.
यात डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात हाेताच ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून विश्वनाथ यांचा मृतदेह देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला. पाेलिसांनी नाकाबंदी करून अपघाताला कारणीभूत असलेला ट्रक पकडला. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी ट्रकचालक महेंद्र माधोराव भलावी रा. नवेगाव (चिचदा), ता. रामटेक याच्या विराेधात भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा केला असून, तपास ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांच्या मार्गदर्शनात सतीश नागपुरे करीत आहेत.
वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच...
विश्वनाथ कुंभलकर यांना शाश्वत (६) व पार्थ (४) ही दाेन मुले आहेत. पार्थचा शुक्रवारी (दि. १४) वाढदिवस हाेता. काही कारणास्तव त्यांनी पार्थचा वाढदिवस शुक्रवार ऐवजी शनिवारी (दि. १५) सायंकाळी साजरा करणार हाेते. मात्र, त्यापूर्वी काळाने त्यांच्यावर झडप घातली. ते ट्रकच्या समाेरच्या चााकाखाली आल्याने त्यांच्या डाेक्याचा चेंदामेंदा झाला हाेता. ताे ट्रक पुसदा पुनर्वसन शिवारातील माया ब्रिक्स असून, विटा घेऊन जात हाेता.