कळमेश्वर - नागपूर मार्गावर पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 09:36 PM2019-10-11T21:36:54+5:302019-10-11T21:38:24+5:30
भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कळमेश्वर) : भरधाव अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - नागपूर मार्गावरील वाय पॉईंटजवळ गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
शैलेश जनार्दन भेंडे (३०, रा. वॉर्ड क्रमांक - १, कळमेश्वर) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते नागपूर शहर पोलीस दलात कॉन्स्टेबलपदी कार्यरत होते. गुरुवारी रात्री ड्युटी संपल्याने ते नेहमीप्रमाणे एमएच-४०/एडी-३१०१ क्रमांकाच्या मोटरसायकलने कळमेश्वरला घरी परत येत होते. कळमेश्वर - नागपूर मार्गावरील दहेगाव शिवारात असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळील वाय पॉईंटजवळ विरुद्ध दिशेने भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पोलिसांनी तातडीने नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे उपचारादरम्यान काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला असून, त्यांना १२ दिवसाचे बाळ आहे. बाळाच्या नामकरण विधीपूर्वीच काळाने बाळापासून वडिलांना हिरावून नेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी कळमेश्वर येथील स्मशानभूमीत पोलीस इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
वाय पॉईंट ‘मृत्यू’चे ठिकाण
वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे दहेगाव (ता. कळमेश्वर) शिवारातील हा वाय पॉईंट आता ‘मृत्यू’चे ठिकाण बनले आहे. यासंदर्भात लोकमतमध्ये काही दिवसांपूर्वी वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. येथील अपघात टाळण्यासाठी येथे गतिरोधक तयार करण्याची सूचना त्या वृत्तात केली होती. शिवाय, तशी मागणीही नागरिकांनी अनेकदा केली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. आता याच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हा प्रशासनाला जाग येईल काय, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला.