नागपुरात विविध भागात सहा जणांचा आकस्मिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 08:06 PM2020-05-19T20:06:20+5:302020-05-19T20:09:23+5:30
शहरातील विविध भागात सहा व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झाला. प्रतापनगर, जरीपटका, वाठोडा, कळमना, अजनी आणि पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील विविध भागात सहा व्यक्तींचा आकस्मिक मृत्यू झाला. प्रतापनगर, जरीपटका, वाठोडा, कळमना, अजनी आणि पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.
प्रतापनगरातील पांडे ले-आऊटमध्ये राहणारे संजय गजानन पात्रीकर (वय ५९) हे सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास चक्कर येऊन खाली पडले. त्यांना उपचाराकरिता मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सायली संजय पात्रीकर (वय २४) यांनी प्रतापनगर पोलिसांना ही माहिती कळविली.
जरीपटक्यातील बेझनबागमध्ये राहणारे चंद्रमणी केशवराव कावळे (वय ४५) यांची सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास प्रकृती खराब झाली. त्यांना उपचारासाठी मेयोत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अजनीतील पार्वतीनगरात राहणारे हरी उरकुडा तागडे (वय ९६) यांची प्रकृती खराब झाल्याने सोमवारी रात्री ७ च्या सुमारास त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनगवळी बाबा नगरात राहणारे हरीश वासुदेव जानवे ( वय २५) हे सोमवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घरात बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना उपचाराकरिता मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
वाठोड्यातील रामकृष्ण नगरात राहणाऱ्या रजनी मोहन सपाटे शेजाऱ्यांसोबत बोलत उभ्या असताना सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने त्या खाली पडल्या. त्यांनी आरडाओरड करून शेजाºयांना गोळा केले. त्यांना उपचाराकरता मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मी ले-आउट वांजरा या भागातील नाल्याच्या काठावर कृष्णा सदाशिव मोटघरे हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांना उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. उपरोक्त सर्व प्रकरणांत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.