पंतप्रधानांच्या काफिल्यातील वाहनांना अपघात

By admin | Published: April 15, 2017 02:31 AM2017-04-15T02:31:05+5:302017-04-15T02:31:05+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याची रंगीत तालीम करताना गुरुवारी दोन वाहने एकमेकांवर आदळली.

Accidents to the Prime Minister's convoy | पंतप्रधानांच्या काफिल्यातील वाहनांना अपघात

पंतप्रधानांच्या काफिल्यातील वाहनांना अपघात

Next

रंगीत तालमीत चालक चुकले : सुरक्षा यंत्रणांत खळबळ
नरेश डोंगरे  नागपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याची रंगीत तालीम करताना गुरुवारी दोन वाहने एकमेकांवर आदळली. हा गंभीर प्रकार चर्चेला आल्यापासून सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पातळीवरून त्याबाबत जाब विचारला गेल्यामुळे संबंधितांनी याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे. या चुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून शुक्रवारी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दीक्षाभूमी, कोराडी, तेथून मानकापूर संकुलातील कार्यक्रमस्थळी आणि त्यानंतर पुन्हा विमानतळ असा सुमारे ५० किलोमीटर अंतराचा मोटार प्रवास करणार, हे ठरले होते.
त्यांच्या या दौऱ्यासाठी वेगवेगळ्या ३६ वाहनांचा काफिला (कॅन्वाय) होता. त्यात आठ विशेष वाहनांचाही समावेश होता. ही सर्व वाहने खास दिल्लीहून नागपुरात बोलवून घेण्यात आली होती. ज्या मार्गाने पंतप्रधान जाणार त्या मार्गाला जोडणारे अन्य सर्व मार्ग आणि तेथून होणारी वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने थांबवली जाते. अर्थात कॅन्वाय मधील वाहनेसुद्धा वायुवेगाने धावतात. या वाहनांवरील चालकही निष्णात असतात. ऐनवेळी कोणत्याही क्षणी वाहन थांबविण्याची गरज पडल्यास आतमधील व्यक्तींना जराही धक्का बसणार नाही, या कौशल्याने हे चालक वाहने चालवितात अन् थांबवितात. गुरुवारी दौऱ्याची रंगीत तालीम (रिहर्सल) करताना दोन वाहनचालकांकडून गल्लत झाली. परिणामी ही वाहने संविधान चौकाजवळ एकमेकांवर आदळली. समोरच्या वाहनांचे तर ठीक होते, ते पुढे निघून गेले. मात्र, मागून येणाऱ्या वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत आपापली वाहने अपघातग्रस्त वाहनांच्या बाजूने कौशल्याने वळवून पुढे नेली.
त्यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, सर्व वाहने नियोजित ठिकाणी पोहचली तर, अपघातग्रस्त वाहनांना तातडीने अज्ञातस्थळी नेण्यात आले. ही बाब उघड झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली.

झाप अन् गोपनीयता
सूत्रांच्या माहितीनुसार, काफिल्यातील वाहनांचा अपघात झाल्याची बाब शीर्षस्थ अधिकाऱ्यांच्या कानावर पोहचताच त्यांनी ती गंभीरपणे घेतली. रंगीत तालिमीऐवजी हा प्रकार पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी घडला असता तर काय परिणाम झाला असता, असा सवाल करीत संबंधितांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर पुन्हा ही गंभीर चूक होऊ नये म्हणून अनुभव असलेल्या वाहनचालकांना बोलवून घेण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा विमानतळ, दीक्षाभूमी, कोराडी, मानकापूर आणि परत विमानतळ असा तब्बल ५० किलोमीटरचा निर्धोकपणे पार पडला. दरम्यान, गुरुवारी रंगीत तालिमदरम्यान झालेल्या अपघाताबाबत कुणीही वाच्यता करू नये, अशा खास सूचना असल्याने सर्वच संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराबाबत बोलण्याचे टाळले. ती वाहने स्थानिक होती, चुकून झाले, असे म्हणत अनेक अधिकाऱ्यांनी सावरासावर केली.

 

Web Title: Accidents to the Prime Minister's convoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.