नागपुरात टुर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकांना अपघात , दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 08:19 PM2018-03-26T20:19:43+5:302018-03-26T20:19:55+5:30
वेगाशी स्पर्धा करणारी कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात कारचालकासह दोघांचा मृत्यू झाला तर, दोघे गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमी एका टुर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक आहेत. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर- सावनेर महामार्गावरील उड्डाणपुलावर रविवारी मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगाशी स्पर्धा करणारी कार दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात कारचालकासह दोघांचा मृत्यू झाला तर, दोघे गंभीर जखमी आहेत. मृत आणि जखमी एका टुर अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक आहेत. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर- सावनेर महामार्गावरील उड्डाणपुलावर रविवारी मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात घडला. कारचालक अमरसिंग (वय ३०, रा. लखनौ) आणि मोहम्मद इद्रिस (बंगळुरू) अशी मृतांची नावे आहेत.
मुंबईच्या अंधेरी (वेस्ट) मध्ये राहणारे राहुल अशोक मेहरा (वय ४०), हार्दिक पटेल (गुजरात), मोहम्मद इद्रिस आणि अमरसिंग या चौघांची भागीदारीत एक टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स कंपनी आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच नागपुरातील रामदासपेठ भागात आपल्या कंपनीचे काम सुरू करण्यासाठी कार्यालय भाड्याने घेतले. येथे त्यांनी कर्मचारी नियुक्त केले. मात्र, कंपनीचे काम अजून प्रत्यक्षात सुरूच व्हायचे आहे. हे चौघे मानकापुरात वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याने राहतात. रविवारी त्यांनी एका मित्राच्या रूमवर पार्टी केली. त्यानंतर पानमसाला घेण्यासाठी ते क्रेटा कार (एमएच ०२/ ईई ८५०६) मध्ये बसून जात होते. कार अमरसिंग चालवीत होता. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. कोराडी मार्गावरील उड्डाणपुलावर (अशोका वाटिका रेस्टॉरंटजवळ) वेगात असलेली कार सोमवारी पहाटे १.३० वाजता दुभाजकावर धडकली. त्यामुळे कारचालक अमरसिंग आणि बाजूला बसलेला इद्रिस ठार झाले तर, मेहरा आणि पटेल हे दोघे जबर जखमी झाले. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेहरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोराडीच्या पोलीस उपनिरीक्षक योगिता तराळे यांनी आरोपी अपघाताची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.