तीर्थयात्रेहून परतताना अपघात; सासरे-जावयाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 08:58 PM2022-11-16T20:58:14+5:302022-11-16T20:59:21+5:30

Nagpur News तीर्थयात्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनाची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सासरे आणि जावई यांचा जागीच मृत्यू झाला, तर कुटुंबातील दहाजण जखमी झाले.

Accidents while returning from pilgrimage; Death of father-in-law | तीर्थयात्रेहून परतताना अपघात; सासरे-जावयाचा मृत्यू

तीर्थयात्रेहून परतताना अपघात; सासरे-जावयाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देट्रकचालकाच्या निष्काळजीपणाचा बसला फटकाखापरीत पहाटे भीषण अपघात; १० जण जखमी

नागपूर : तीर्थयात्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनाची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सासरे आणि जावई यांचा जागीच मृत्यू झाला, तर कुटुंबातील दहाजण जखमी झाले. वर्धा मार्गावरील खापरी येथे बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर नातेवाइकांमध्ये शोककळा पसरली आहे. प्रभात रामचंद्र बावनकर (२८, रा. मोवाड, बालाघाट) व रणजित सुखराम शेंडे (५५, हजारीपहाड) अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातात प्रभातची पत्नी स्वाती बावनकर (२६), सासू रंजना रणजित शेंडे (५०), संजय लक्ष्मण कनोजिया (४३), प्रमिला विठ्ठल पडधान (६०), छाया रामचंद्र शेंडे (५०), माधुरी धर्मराज सोनटक्के (३०), ओम धर्मराज सोनटक्के (१०), वैष्णवी धर्मराज सोनटक्के (७), लावण्या विजय गोलाईत (६), सिद्धिक प्रभात बावनकर (५) हे जखमी झाले आहेत.

प्रभात बावनकर हे मूळचे बालाघाट येथील रहिवासी असून, बंगळुरू येथील एका आयटी कंपनीत कामाला होते. त्यांचे सासरे रणजित शेंडे हे फर्निचरचे काम करतात. दिवाळीच्या सुट्टीमुळे प्रभात पत्नी व मुलांसह हजारीपहाड येथे सासरच्या घरी आले होते. प्रभात, शेंडे कुटुंब आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेट देण्याचा निर्णय घेतला. संजय कनोजिया यांचा टाटा विंगरने (क्र. एमएच ०४ डीआर ९१९४) ते १२ नोव्हेंबर रोजी प्रवासासाठी निघाले. परळी वैजनाथला दर्शन करून ते पंढरपूरला पोहोचले. सोमवारी तेथून निघून लगेच मंगळवारी शिर्डी येथे पोहोचले. अगोदरच्या नियोजनानुसार ते शिर्डी येथे मुक्काम करणार होते, मात्र वेळेवर दर्शन झाल्याने मंगळवारी दुपारी ४ वाजता नागपूरच्या दिशेने निघाले. परंतु घरी पोहोचण्याअगोदरच रस्त्यात काळाने प्रभात व रणजित यांना गाठले. विंगरचालक संजय कनोजिया यांच्या फिर्यादीवरून बेलतरोडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वाती बावनकर व प्रमिला पडधान या गंभीर जखमी झाल्या आहेत.

..असा झाला अपघात

बुधवारी पहाटे ३ वाजता खापरी येथील महेश धाब्याजवळ ट्रक (क्र. पीबी १३ बीएच ६७६७) रस्त्याच्या कडेला उभा होता. चालकाने ट्रकचे पार्किंग लाइट किंवा रिफ्लेक्टरही लावले नव्हते. चालकाला ट्रकजवळ पोहोचल्यावर तो दिसला. त्याने डाव्या भागाकडे गाडी वळविण्याचा प्रयत्न केला. यात डावा भागच ट्रकच्या मागील बाजूस आदळला. विंगरच्या वेगामुळे त्याच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. पहाटेची वेळ असल्याने ड्रायव्हरवगळता बहुतांश लोक झोपले होते. चालकाच्या शेजारी बसलेले प्रभात आणि त्यांच्या मागे बसलेले रणजित यांच्या डोक्याला जखमा झाल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेले. इतर आठ जखमींच्या प्रकृतीत किरकोळ सुधारणा झाली आहे. सर्वांवर उपचार सुरू आहेत.

ट्रकचालक फरार, मात्र नंबर प्लेट तुटली

अपघातानंतर ट्रकचालक लगेच ट्रक घेऊन फरार झाला. मात्र विंगरच्या समोरील भागात त्याची मागची नंबर प्लेट फसली होती. ट्रकचालकाने बेजबाबदारपणे मार्गातच ट्रक थांबविला होता व रिफ्लेक्टर नसल्याने तो चालकाला दिसलाच नाही.

वडिलांना शोधतेय चिमुकल्याची सैरभैर नजर

तीर्थयात्रेवरून परतल्यावर सर्वांची भेट घेण्याचे इतर नातेवाइकांनी ठरविले होते. जाताना ज्यांना आनंदाने निरोप दिला होता त्यांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने नातेवाइकांमध्ये शोककळा आहे. या अपघातात प्रभात यांचा पाच वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. त्याची आई गंभीर जखमी आहे. वडील गमावल्यानंतर आईदेखील दवाखान्यात असल्याने त्याला धक्का बसला आहे. काहीच कळत नसलेल्या वयात त्याची सैरभैर नजर लाडके वडील व आजोबांना शोधत होती.

Web Title: Accidents while returning from pilgrimage; Death of father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.