वॉर्डानुसार निवडणुकीमुळे मातब्बरांची धाकधूक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:09 AM2021-08-26T04:09:44+5:302021-08-26T04:09:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका निवडणुका एक सदस्यीय की दोन सदस्यीय प्रभागानुसार होणार असल्याच्या चर्चांना विराम लागला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका निवडणुका एक सदस्यीय की दोन सदस्यीय प्रभागानुसार होणार असल्याच्या चर्चांना विराम लागला आहे. निवडणुका एक सदस्यीय वॉर्डानुसार होणार आहेेत. आरक्षणानंतरच वॉर्डातील स्थिती स्पष्ट होणार असल्याने मातब्बरांची धाकधूक वाढली आहे. प्रभागाच्या तुलनेत आता वॉर्डाचे क्षेत्र लहान असल्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचे प्रमाण वाढेल. यामुळे राजकीय पक्षांचीही डोकेदुखी वाढणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या महापालिकांना एक सदस्यीय वॉर्डानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राहणार आहे. महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव असतील. अनुसूचित जाती, जमातीसाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर वॉर्डातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आरक्षणानंतर राष्ट्रीयीकृत पक्षाचे उमेदवार ठरतील. विद्यमान नगरसेवकांना संधी मिळणार की, घरी बसावे लागणार हे स्पष्ट होईल. वॉर्डनुसारच्या निवडणुकीत आरक्षणामुळे संधी हुकण्याची शक्यता असल्याने वजनदार नगरसेवकांची चिंता वाढली आहे.
नागपूर महापालिकेत ३८ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात चार असे १५१ नगरसेवक आहेत. पुढील निवडणूक एक सदस्यीय प्रभागानुसार होणार असल्याने १५१ वॉर्ड राहणार आहेत. चार सदस्यीय प्रभागांचा राष्ट्रीयीकृत पक्षांना मोठा फायदा मिळाला होता. याचा प्रामुख्याने मनपातील सत्ताधारी भाजपला लाभ झाला होता. पक्षाचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. बसपाचे १०, शिवसेना २ तर राष्ट्रवादी काँग्रेस १ व अपक्ष १ असे सध्या संख्याबळ आहे.
...जोड आहे...