अकाऊंट सील, पैसे ‘निल’
By Admin | Published: May 9, 2015 02:24 AM2015-05-09T02:24:21+5:302015-05-09T02:24:21+5:30
एलबीटी (स्थानिक संस्था कर) न भरणाऱ्यांविरोधात महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुुरुवात केली आहे.
नागपूर : एलबीटी (स्थानिक संस्था कर) न भरणाऱ्यांविरोधात महापालिकेने कठोर पावले उचलण्यास सुुरुवात केली आहे. गुरुवारी एलबीटी विभागाने आठ कंपन्यांचे बँक खाते सील केले होते. शुक्रवारी गांधीबाग येथील साडी विक्रेते कमल सुंदरलाल वाधवा यांचे बँक खाते सील करण्यात आले. मात्र, त्यांच्या खात्यात पैसेच नव्हते. आता विभागाने संबंधित व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त करण्याची तयारी चालविली आहे.
महाराष्ट्र महापालिका कायदा १९४९ अंतर्गत एलबीटी विभागाने मे. खुशी क्रिएशन, ५-ए, विनायक भवन, गांधीबागचे मालक कमल वाधवा यांचे बँक खाते सील केले. वाधवा यांनी ८२ लाख ४० हजार ८३४ रुपयांच्या साड्या मागविल्या मात्र, एलबीटी भरला नाही. वाधवा यांना सुनावणीसाठी दोनदा संधी देण्यात आली. मात्र, तरीही त्यांनी आपली बाजू मांडली नाही. मूल्यांकनानंतर त्यांना ८५ हजार ९१४ रुपयांची डिमांड नोटीस जारी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती रक्कम न भरल्याने त्यांचे बँक खाते सील करण्यात आले. मात्र, खात्यात रक्कम मिळाली नाही. त्यामुळे आता त्यांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. (प्रतिनिधी)