पोळ्यानिमित्त नागपूर शहरात चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:29 PM2019-08-29T23:29:19+5:302019-08-29T23:35:09+5:30
पोळा आणि तान्हा पोळ्याचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. ६०० होमगार्डस् आणि २ हजार पोलीस पोळा सणाचा तसेच मारबत उत्सवाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोळा आणि तान्हा पोळ्याचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. ६०० होमगार्डस् आणि २ हजार पोलीस पोळा सणाचा तसेच मारबत उत्सवाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत.
उपराजधानीत पोळा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात येतो. बैल पोळा आणि तान्ह्या पोळ्याच्या मध्ये मारबतची भव्यदिव्य मिरवणूक काढली जाते. मारबत-बडग्याची मिरवणूक उपराजधानीचे सांस्कृतिक वैभव आहे. या मिरवणुकीत सर्व जातीधर्मातील लाखो लोक सहभागी होतात. पोळ्याच्या उत्सवात दारू विक्री आणि जुगारालाही उधाण येते. दारूच्या नशेत वादविवादही घडतात. ते होऊ नये, सर्वांनी उत्साहात आणि आनंदात पोळ्याच्या सणाचा आनंद लुटावा, यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे खास नियोजन केले आहे. त्यासाठी उपराजधानीतील पाचही परिमंडळात गुरुवारी रात्रीपासूनच पोळा बंदोबस्त लावण्यात आला. सर्वाधिक बंदोबस्त परिमंडळ तीनमध्ये लावण्यात आला आहे. तहसील, पाचपावली आणि लकडगंज परिसरात मारबत-बडग्याच्या मिरवणुकीचा जल्लोष सर्वाधिक असतो. त्यामुळे या परिसरात १५ पोलीस निरीक्षकांसह एकूण ९० अधिकारी, ६३२ पोलीस कर्मचारी आणि ४९ महिला कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
शुक्रवार सकाळपासून शहरातील संवेदनशील, अतिसंवेदनशील भागात फिक्स पॉर्इंट लावण्यात येणार आहे. झोपडपट्ट्या सर्चिंग मोहीम राबविण्यात येणार असून, सीआर मोबाईल, बीट मार्शल यांना गस्तीसोबतच सूचना मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. दंगा नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक तसेच अतिरिक्त राखीव पोलीस बल सज्ज ठेवण्यात येणार आहे. गुंडांच्या हालचालींवर लक्ष ठेवून कुठे काही गडबड झाल्यास तात्काळ कोणत्या उपाययोजना करायच्या, त्यासंबंधानेही सूचना देण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी भरणाऱ्या जुगारांवरही पोलीस नजर ठेवणार आहेत.
आनंदाने, सतर्कपणे सण साजरा करा : पोलीस आयुक्त
उपराजधानीतील मारबत-बडग्यांची मिरवणूक देशभरात आकर्षणाचा विषय आहे. या मिरवणुकीत लाखोंची गर्दी होते. सणोत्सवाचे निमित्त साधून समाजकंटक सक्रिय होतात. त्यांचे कलुषित मनसुबे पूर्णत्वास जाऊ नये म्हणून पोलीस प्रयत्नशील आहेतच. मात्र, नागरिकांनीही उत्साह आणि आनंदाने सण साजरा करतानाच सतर्कताही बाळगावी, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.
असा राहणार बंदोबस्त!
पोलीस निरीक्षक : ३०
अन्य पोलीस अधिकारी : १९०
पोलीस कर्मचारी : १५४०
महिला पोलीस : २१७
होमगार्ड : ४००
महिला होमगार्ड : २००