ई-पंचनाम्यामुळे मिळणार नुकसानीची अचूक माहिती; विजयलक्ष्मी बिदरी

By गणेश हुड | Published: August 1, 2023 04:30 PM2023-08-01T16:30:11+5:302023-08-01T16:30:11+5:30

नागपूर विभागात देशातील पहिलाच प्रयोग. राज्यभरात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने बिदरी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांना ‘ई- पंचनामे’ या उपक्रमाची माहिती दिली.

Accurate information on loss due to e-Panchnama; Vijayalakshmi Bidari | ई-पंचनाम्यामुळे मिळणार नुकसानीची अचूक माहिती; विजयलक्ष्मी बिदरी

ई-पंचनाम्यामुळे मिळणार नुकसानीची अचूक माहिती; विजयलक्ष्मी बिदरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक आणि गतीने पंचनामे व्हावे, यासाठी नागपूर विभागात प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर ‘ई-पंचनामे’ पद्धती राबविली जात आहे. देशात व राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. ई-पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना अविलंब मदत देणे शक्य होणार आहे. नुकसानीचे पंचनामे येत्या ५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवारी दिली.

राज्यभरात १ ऑगस्टपासून महसूल सप्ताहाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने बिदरी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकारांना ‘ई- पंचनामे’ या उपक्रमाची माहिती दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक व पशुधनाचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे तातडीने व्हावे, शासनाकडून मिळणाऱ्या सर्व प्रक्रिया पारदर्शी व गतिमान करण्यासाठी विभागात ई-पंचनामे हा अभिनव प्रयोग राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर २०२२ पासून यासंदर्भात मोबाइल ॲप्लिकेशन व सॉफ्टवेअर तयार करण्यास सुरुवात झाली. संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्य शासनाच्या महारिमोट सेंसिंग विभाग (एमसॅक) आणि महसूल व मदत व पुनर्वसन विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या ॲप्लिकेशनचा प्रत्यक्ष वापर सुरू करण्यात आल्याचे बिदरी यांनी सांगितले.

असा होतो ई-पंचनामा
आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वत: तलाठी शेतकऱ्याच्या बांधावर जातात. तेथील छायाचित्र घेऊन ॲप्लिकेशनवर अपलोड करतात. ॲप्लिकेशनवर आधीच भरण्यात आलेल्या मंडळनिहाय सर्व्हे व गट क्रमांकनिहाय नुकसानीची ही माहिती तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांद्वारे भरण्यात येते. त्याची शेतकऱ्यांकडून आधीच ई-पीक पाहणीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीशी पडताळणी होते. नंतर तहसीलदारांकडून तपासून विभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविली जाते. नंतर ती राज्य शासनाकडे पाठविली जाते. जाहीर कलेली मदत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा होईल, असे बिदरी यांनी सांगितले.

३० हजार ५९९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
नागपूर विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास ३० हजार ५९९ हेक्टर जमिनीवरीनल पिकांचे नुकसान झाले असून, यासंदर्भात ५२ टक्क्यांपर्यंत पंचनामे पूर्ण झाले आहेत. या कामास गती देऊन महसूल सप्ताहातच ५ ऑगस्टपर्यंत उर्वरित सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्ह्यांना देण्यात आले आहे.

Web Title: Accurate information on loss due to e-Panchnama; Vijayalakshmi Bidari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस