आता जमिनीची अचूक मोजणी शक्य, नागपूर विभागात १२ (कॉर्स) जीपीएस सेंटर कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 10:52 AM2023-10-06T10:52:40+5:302023-10-06T10:53:16+5:30
मोजणीचे नकाशे रियल टाइममध्ये अचूक मिळणे शक्य
नागपूर : जमिनीच्या मोजणीमध्ये अचूकता येण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या मोजणीचे नकाशे अक्षांश व रेखाशांसह तयार करण्यासाठी कॉर्स अर्थात निरंतर संचालन संदर्भ केंद्राची राज्यात ७७ ठिकाणी उभारणी झाली आहे. त्यापैकी १२ कॉर्स केंद्र नागपूर विभागात सुरू झाले आहेत. कॉर्सच्या उभारणीमुळे वैश्विक स्थान निश्चिती (जीपीएस) आणि नकाशे तयार करण्यासाठी ग्लोबल नेवीगेशन सॅटेलाइट सिस्टिममुळे हवे असलेले अचूक नकाशे तात्काळ उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
जमिनीच्या मोजणीचे अचूक नकाशे तयार करण्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभागाअंतर्गत राज्य शासनाने निरंतर संचालन संदर्भ केंद्र म्हणजेच कॉर्सची उभारणी केली आहे. त्यासाठी राज्यामध्ये एकमेकांपासून साधारणपणे ७० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठिकाणाची निवड केली आहे. जीएनएसएसचा वापरामुळे अत्यंत अचूक तसेच सध्याच्या वेळेनुसार नकाशे उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. तसेच हवे तेव्हा अचूकपणे नकाशे तयार करणे सुलभ झाले आहे.
नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील गाव नकाशे या प्रणालीद्वारे सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची माहिती भूमिअभिलेख उपसंचालक विष्णू शिंदे यांनी दिली.
- या ठिकाणी आहेत जीपीएस स्टेशन
नागपूर : (भिवापूर) ग्रामपंचायत परिसर, कळमेश्वर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर.
वर्धा : आष्टी येथील तहसील कार्यालय परिसर व देवळी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह परिसरात.
चंद्रपूर : राजुरा भूमिअभिलेख कार्यालय परिसर, मूल येथे इकोपार्क परिसर.
गडचिरोली : वडसा येथील तहसील कार्यालय, कोरची येथील पंचायत समिती कार्यालय तसेच धानोरा व मुलचेरा येथील तहसील कार्यालय परिसरात.
भंडारा : गांधी विद्यालय परिसर भंडारा,
गोंदिया : सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालय परिसरात.
होणारे फायदे
- सर्व प्रकारचे मोजणी नकाशे अक्षांश व रेखाशांसह तयार होणार आहे.
- जीपीएस रीडिंगची अचूकता वाढवून मोजणी कामामध्ये गतिमानता आली आहे.
- गावठाण हद्दी निश्चिती अचूक व जलद करणे सुलभ झाले आहे.
- भविष्यात येणाऱ्या काही वर्षांमध्ये सर्व नकाशे जिओ रेफरेन्स होतील.
- खाणकाम मोजणीसाठी रोव्हरचा उपयोग होईल त्यामुळे तात्काळ मोजणी शक्य झाले आहे.