बजोरिया कन्स्ट्रक्शनवर घोटाळ्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 02:59 AM2016-09-22T02:59:49+5:302016-09-22T02:59:49+5:30

यवतमाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य संदीप बजोरिया हे संचालक असलेल्या बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीने विविध

Accusations of scandal on bajraia construction | बजोरिया कन्स्ट्रक्शनवर घोटाळ्याचा आरोप

बजोरिया कन्स्ट्रक्शनवर घोटाळ्याचा आरोप

Next

हायकोर्टात जनहित याचिका : उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची विनंती
नागपूर : यवतमाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य संदीप बजोरिया हे संचालक असलेल्या बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीने विविध सिंचन प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
अतुल जगताप असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते कंत्राटदार आहेत. एका जनहित याचिकेत त्यांनी अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्पातील गैरव्यवहारावर प्रकाश टाकला आहे. शासनाने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील अर्थ वर्क सीसी लायनिंग व लेफ्ट बँक मेन कॅनलच्या बांधकामाचे कं त्राट बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. परंतु, कंपनीकडे अशा प्रकारची कामे करण्याची पात्रता नाही. कंपनीने खोटे व बनावट दस्तावेज सादर करून हे काम मिळविले आहे. कंपनीचे संचालक संदीप बजोरिया यांचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत. कंपनीला हे कंत्राट देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. कंपनीने या कामासाठी शासनाकडून आगाऊ रक्कम घेतली आहे. परंतु, ही रक्कम या कामावर खर्च न करता विधान परिषदेच्या निवडणुकीत वापरण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे होते. परंतु, ५ वर्षाचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. परिणामी शेतकरी आजही पाण्याची प्रतीक्षाच करीत आहेत. कंपनीचा घोटाळे करण्यात हातखंडा आहे. यामुळे कंपनीविरुद्ध आतापर्यंत अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)


अशा आहेत मागण्या
बजोरिया कंपनीला मिळालेल्या विविध कंत्राटांची चौकशी करण्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, चौकशीत दोषी आढळणारे कंपनीचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात यावी, कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, कंपनीला दिलेली कंत्राटे रद्द करून संबंधित कामासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, संबंधित प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या, अशा याचिकाकर्त्याच्या मागण्या आहेत.
जिगाव प्रकल्पात गैरव्यवहार
अतुल जगताप यांनी दुसऱ्या याचिकेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकल्पाचे कामही बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. कंपनीने हे कंत्राटसुद्धा राजकीय बळाचा उपयोग करून मिळविले आहे. निविदेसोबत खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत असे जगताप यांचे म्हणणे आहे.

राज्य शासनाला नोटीस
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी बुधवारी दोन्ही याचिकांवर सुनावणी केल्यानंतर पाटबंधारे विभागाचे सचिव, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, अमरावती जल संसाधन विभागाचे मुख्य अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अप्पर वर्धा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, खामगाव येथील मुन प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटीस बजावून २० आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित तर, शासनातर्फे सहायक वकील नितीन रोडे यांनी बाजू मांडली.

Web Title: Accusations of scandal on bajraia construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.