अकोला जिल्ह्यातून हत्या करून फरार झालेल्या आरोपींना शालीमार एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल अटक
By नरेश डोंगरे | Published: July 24, 2023 10:18 PM2023-07-24T22:18:13+5:302023-07-24T22:19:10+5:30
अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून शेतीच्या वादातून त्यांनी नातेवाईकाची हत्या केली.
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मुंबईहून कोलकाता (हावडा) कडे निघालेली शालीमार एक्सप्रेस येथील फलाट क्रमांक तीनवर थांबली अन् या गाडीच्या जनरल बोगीत धडधड धडधड पोलीस शिरले. मागच्या, पुढच्या डब्यांची तपासणी केल्यानंतर दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रेल्वेस्थानकावरील पोलीस ठाण्यात नेले. हे दोन आरोपी म्हणजे, सुरेश गहले आणि शूभम गहले होय. ते अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून शेतीच्या वादातून त्यांनी नातेवाईकाची हत्या केली आणि ते पश्चिम बंगालकडे पळून जात होते. मात्र, खबर मिळताच सोमवारी दुपारी त्यांना येथील रेल्वे पोलिसांनी शालीमार एक्सप्रेसमधून सिनेस्टाईल अटक केली.
रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकोट तालुक्यातील रहिवासी आरोपी सुरेश गहले आणि त्याचा लहान भाऊ ज्ञानेश्वर या दोघांमध्ये वडिलोपार्जित शेतीच्या हिस्सेवाटणीवरून वाद होता. या पार्श्वभूमीवर, रविवारी दुपारी ज्ञानेश्वर गहले शेतात फवारणी करीत असताना आरोपी सुरेश आणि त्याचा मुलगा शूभम तेथे आले. त्यांनी ज्ञानेश्वर यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर लोखंडी पाईप तसेच कुऱ्हाडीने हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर गहले यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपी पिता-पूत्र फरार झाले. त्यांचा शोध घेणाऱ्या आकोट पोलिसांना आरोपी गहलेंचे धावते लोकेशन नागपूरकडे दिसल्याने पोलीस सक्रिय झाले. ते ट्रेनमध्ये जात असावे, हे लक्षात आल्यानंतर परिक्षाविधीन पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांनी नागपूर रेल्वे पोलिसांना सोमवारी दुपारी १ च्या सुमारास ही माहिती कळवून आरोपींचे वर्णन सांगितले. त्यानुसार, येथील रेल्वे ठाण्याचे एपीआय सरवदे तसेच कर्मचारी अमोल हिंगणे, सतीश घुरडे, राजगिरे, संजय पटले, प्रवीण खवसे, अमित त्रिवेदी यांनी दुपारी १.३० च्या सुमारास शालीमार एक्सप्रेसचे कोच तपासणे सुरू केेले. समोरच्या डब्यात पोलिसांना आरोपी गहले पिता-पूत्र आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन खाली उतरवून रेल्वे पोलीस ठाण्यात नेले. आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती कळताच अकोट पोलीस सायंकाळी नागपुरात पोहचले. रेल्वे पोलिसांकडून आरोपींचा ताबा घेऊन पोलीस अकोटकडे रवाना झाले.
आरोपींचा विनातिकिट प्रवास
रविवारी हत्या केल्यानंतर आरोपी गहले बापलेक अकोल्यात दडून होते. सोमवारी सकाळी ते शालीमार एक्सप्रेसमध्ये बसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींकडे रेल्वेचे तिकिटही आढळले नाही. ते विनातिकिटच प्रवास करीत होते.