सामूहिक बलात्कार प्रकरणातील अडीच महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 10:49 PM2021-12-23T22:49:35+5:302021-12-23T22:50:10+5:30
Nagpur News रात्रीच्या वेळी मित्रासोबत निर्जन ठिकाणी बसलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार करून फरार झालेल्या तीन आरोपींच्या मुसक्या बांधण्यात अखेर एमआयडीसी पोलिसांनी यश मिळवले.
नागपूर : रात्रीच्या वेळी मित्रासोबत निर्जन ठिकाणी बसलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार करून फरार झालेल्या तीन आरोपींच्या मुसक्या बांधण्यात अखेर एमआयडीसी पोलिसांनी यश मिळवले. शिवेंद्र सुरेश पटेल (वय २८), अजय राधेलाल म्हात्रे (वय २१) आणि दाऊ उर्फ सूरज घनश्याम कुशवाह (वय २९) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणातील फिर्यादी तिच्या प्रियकरासोबत २ ऑक्टोबरला फिरत असताना आरोपी हर्षल ठाकरे तसेच आकाश भंडारीने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ४ ऑक्टोबरला आरोपी सूरणकर, पांढरे आणि फिरोज यांनी आकाश भंडारीला ३०० रुपये देऊन युवतीवर बलात्कार केला. ७ ऑक्टोबरला रात्री युवती आणि तिचा आरोपी प्रियकर आकाश यांनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. हे दोघे माधवनगरीजवळून परत घराकडे जात असताना तीन आरोपींनी आकाशला मारहाण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी आकाशचा मोबाइलही हिसकावून नेला. एका स्थानिक नेत्याने एमआयडीसी पोलिसांना फोन करून माहिती दिल्यामुळे या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा बोभाटा झाला.
एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून करून आकाश उदेलाल भंडारी (वय २०, रा. ईसासनी), संदीप अशोकराव पांढरे (वय २२), फिरोज शफी शेख (वय २४) आणि अजय भानुदास सूरणकर (वय २०, रा. पंचशीलनगर, ईसासनी) तसेच हर्षल कैलास ठाकरेला अटक केली. मात्र, तीन आरोपी अनोळखी असल्याने त्यांचा पत्ता लागत नव्हता. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार उमेश बेसरकर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सहायक निरीक्षक रमेश हत्तीगोटे, दीपक दासरवार, राजाराम ढोरे, हवालदार विजय काळे, नायक जितेंद्र खरपुरिया, दीपक सराटे, पंकज मिश्रा आणि इस्माईल यांनी खबऱ्यांना कामी लावून अखेर तीन आरोपींचा छडा लावला.
गैरसमज झाल्याने आरोपी बिनधास्त होते
यातील आरोपी अजय राधेलाल म्हात्रे (वय २१) हा बालाघाट येथे पळून गेला होता. तर, शिवेंद्र सुरेश पटेल (वय २८), आणि दाऊ उर्फ सूरज घनश्याम कुशवाह (वय २९) हे दोघे आपल्याला बलात्कार करताना कुणी बघितले नाही, त्यामुळे आपल्याला पोलीस अटक करणार नाहीत, असा गैरसमज बाळगून होते. त्यामुळे ते एमआयडीसीतच वावरत होते. मात्र, पोलिसांनी त्यांचा छडा लावून त्यांच्या मुसक्या बांधल्या.
---