सुनेने 13 लाखांची खंडणी मागितल्याचा सासूचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 07:25 PM2017-12-03T19:25:14+5:302017-12-03T19:25:36+5:30
नागपूर : कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या वादानंतर नातेवाईकांसह सासरी आलेल्या सुनेने तिच्या सासूला धक्काबुक्की करून १३ लाखांची खंडणी मागितली. ही रक्कम दिली नाही तर खोटी तक्रार करून फसविण्याची धमकी दिली.
नागपूर : कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या वादानंतर नातेवाईकांसह सासरी आलेल्या सुनेने तिच्या सासूला धक्काबुक्की करून १३ लाखांची खंडणी मागितली. ही रक्कम दिली नाही तर खोटी तक्रार करून फसविण्याची धमकी दिली. दीड वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या आदेशावरून अंबाझरी पोलिसांनी प्रीती (वय ३४) आणि तिच्या नातेवाईकांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला.
तक्रारदार महिला (वय ५६) अंबाझरीत राहते. दोन वर्षांपूर्वी तिच्या मुलासोबत प्रितीचा विवाह झाला होता. कौटुंबिक कलह वाढल्यानंतर प्रीती नव-याचे घर सोडून माहेरी तेलंगणात निघून गेली.
तिने कागज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून कागज पोलिसांनी कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याच्या तपासासाठी ८ आॅगस्ट २०१६ ला पोलीस तक्रारदार महिलेच्या अंबाझरीतील घरी गेले. यावेळी प्रितीचा रवींद्र नामक नातेवाईकाने तक्रारदार महिलेसोबत लज्जास्पद भाषा वापरली. गोपी दीपक तिबडा नामक व्यक्तीने केस सेटल करायची असेल, तर १३ लाख रुपये द्यावे लागेल. पैसे दिले नाही तर पुन्हा दुसरी केस करून फसवण्याची धमकी दिली. यावेळी विजय पचेरियावाला तसेच सौरभ अग्रवाल यांनी उपरोक्त आरोपींच्या मदतीने धाकदपट करीत महिलेच्या घरातील किंमती सामान जबरदस्तीने काढून नेले.
या प्रकरणाची तक्रार त्यावेळी महिलेने अंबाझरी ठाण्यात नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरगुती वादाचे स्वरूप असल्याचे सांगून पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे फिर्यादी महिलेने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने या संबंधाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे पोलिसांनी फिर्यादी महिलेची सून प्रिती आणि तिच्या उपरोल्लेखित नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून अंबाझरी पोलिसांनी फिर्यादी महिलेचा विनयभंग करून, धाकदपट करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून जबरस्तीने घरातील साहित्य चोरून नेणे, आदी आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
प्रकरणात पोलिसांची लपवाछपवी
या संबंधाने अंबाझरी पोलीस ठाण्यात वारंवार संपर्क करूनही पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळाली नाही. प्रकरण मोठ्या घरचे आहे, एवढे सांगून एका पोलिसाने फोन कापला. तर दुस-याने माहिती कक्षात माहिती दिली आहे, असे सांगून याबाबत बोलण्याचे टाळले. पोलिसांची ही लपवाछपवी कशासाठी आहे, ते स्पष्ट होऊ शकले नाही.