प्रवाशाला गुंगीचे औषध देणाऱ्यास रेल्वेगाडीतच अटक : गीतांजली एक्स्प्रेसमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:49 PM2019-07-31T23:49:00+5:302019-07-31T23:51:04+5:30

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मोतीबाग ठाण्यात तैनात आरपीएफच्या जवानांनी रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन त्यांची रक्कम पळविणाऱ्या आरोपीस रेल्वेगाडीतच अटक केली.

Accused arrested for giving drugs to passenger | प्रवाशाला गुंगीचे औषध देणाऱ्यास रेल्वेगाडीतच अटक : गीतांजली एक्स्प्रेसमधील घटना

प्रवाशाला गुंगीचे औषध देणाऱ्यास रेल्वेगाडीतच अटक : गीतांजली एक्स्प्रेसमधील घटना

Next
ठळक मुद्देप्रवाशाच्या खिशातून पळविले ३० हजार रुपये

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील मोतीबाग ठाण्यात तैनात आरपीएफच्या जवानांनी रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला गुंगीचे औषध देऊन त्यांची रक्कम पळविणाऱ्या आरोपीस रेल्वेगाडीतच अटक केली. आरोपीकडून प्रवाशाच्या खिशातून चोरी केलेले ३० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.
निजामुद्दीन परमोद्दीन (३५) रा. किसनगंज, बिहार असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफचा जवान सुरेश कुमार, राजू आणि आर. एस. विद्यार्थी यांना गीतांजली एक्स्प्रेसमध्ये गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, एस ८ कोचमध्ये ६० क्रमांकाच्या बर्थवरून प्रवास करीत असलेला शेख हाशीम (४७) रा. बेमाटी, बंगाल हा प्रवासी टीटीईच्या मदतीने आरपीएफ जवानांजवळ पोहोचला, तो कल्याण ते खडकपुर असा प्रवास करीत असल्याची माहिती त्याने दिली. दरम्यान, एका सहप्रवाशाने त्याला पाणी पाजले. पाण्यात गुंगीचे औषध दिले. यामुळे त्यांना गाढ झोप लागली. दरम्यान त्या सहप्रवाशाने त्यांच्या खिशातून ३० हजार रुपये काढले. माहिती देतानाही हाशीम यांना झोप येत होती.
बर्थखाली लपला होता आरोपी
रेल्वेगाडी कुठेच थांबली नसल्यामुळे आरपीएफ जवानांना आरोपी रेल्वेगाडीतच असावा, असा संशय आला. तिन्ही आरपीएफ जवानांनी सर्व कोचची पाहणी सुरू केली. काही वेळाचत एस ११ कोचमध्ये निजामुद्दीन एका बर्थखाली लपलेला दिसला. त्याला बाहेर काढून प्रवासी हाशीमच्या समोर आणले असता हाशीमने त्वरित त्यास ओळखले. आरोपीची तपासणी केली असता त्याच्याजवळ चोरी केलेले ३० हजार रुपये होते. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली. घाईगडबडीत पाण्यात जास्तीचे गुंगीचे औषध टाकू शकलो नसल्याचे त्याने आरपीएफ जवानांना सांगितले. जास्त औषध टाकले असते तर हाशीम दोन दिवस झोपूनच राहिला असता, असे आरोपीने सांगितले. त्यानंतर आरपीएफ जवानांनी आरोपीला दुर्ग लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. तेथून हे प्रकरण गोंदिया लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय यांनी आरपीएफ जवानांच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

Web Title: Accused arrested for giving drugs to passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.