अजगराला कुऱ्हाडीने मारून जाळणाऱ्या आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 09:02 PM2019-07-13T21:02:13+5:302019-07-13T21:03:03+5:30
कामठीच्या कवठा-वारेगाव मार्गावर जिवंत अजगर पकडून त्याचे कुऱ्हाडीने तुकडे करून मारणाऱ्या आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपींना वन विभागाच्या चमूने अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठीच्या कवठा-वारेगाव मार्गावर जिवंत अजगर पकडून त्याचे कुऱ्हाडीने तुकडे करून मारणाऱ्या आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या आरोपींना वन विभागाच्या चमूने अटक केली आहे.
ओमप्रकाश नन्नेसिंह धुर्वे (२९), रोहित अशोक वानखेडे (१८) आणि सुचित नरेश मुळे (१८) रा. कवठा, कामठी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना मारलेला अजगर पायधान प्रजातीतील असून वन विभागाच्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहे. ही घटना सोमवारी १ जुलैला घडली होती. आरोपींनी कवठावरून वारेगाव रोड पुलाजवळ अजगराला मारले होते. त्यानंतर अजगरला क्रूरपणे मारल्याचा आणि जाळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ वन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरुन सेमिनरी हिल्सचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय गंगावने यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी चमू गठित केली. त्यानंतर चमूला व्हिडीओतील आरोपी कवठा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. वन विभागाच्या चमूने आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडले. परंतु तपासात आरोपींचा या घटनेत समावेश असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर शनिवारी ६ जुलैला त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२, जैव विविधता कायदा २००२ च्या कलम ५६ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपींना याबाबत माहिती मिळताच ते भीतीने फरार झाले होते. १२ जुलैला शुक्रवारी आरोपी कवठा गावात परतल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर लगेच वन कर्मचारी एम. व्ही. पाटील, एन. एल. वाघ, ए. जी. कुरेशी, एन. ए. रमधम, एल. डी. अतकुलवार, डी. के. राघोर्ते, एस. बी. बानमारे यांनी आरोपींना अटक केली.