पिस्तूल अन् दोन जीवंत काडतुसासह आरोपीला अटक
By दयानंद पाईकराव | Published: September 11, 2024 03:18 PM2024-09-11T15:18:28+5:302024-09-11T15:19:45+5:30
नंदनवनमधील घरातून जप्त केले शस्त्र : गुन्हे शाखेच्या युनिट ५ ची कामगिरी
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने पिस्तूल, स्टीलची मॅगझीन आणि दोन जीवंत काडतुसासह एका आरोपीला अटक करून नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
शिलवंत भगवान सोनटक्के (३७, रा. पडोळेनगर नंदनवन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथक मंगळवारी १० सप्टेंबरला दुपारी ३.५० ते सायंकाळी ६ दरम्यान नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. तेवढ्यात गुप्त बातमीदाराने आरोपी शिलवंतजवळ पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या युनिट ५ मधील पोलिसांनी आरोपी शिलवंतच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात एका जुन्या बॅगमध्ये पिस्तूल, स्टीलची मॅगझिन आणि दोन जीवंत काडतुस आढळले. लगेच आरोपी शिलवंत ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलसह ८१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने मनाई आदेशाचे उल्लंघन करून प्राणघातक शस्त्र बाळगल्याने हवालदार राजेंद्र टाकळीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट ५ मधील उपनिरीक्षक राजेश लोही, हवालदार राजेंद्र टाकळीकर, प्रविण भगत, गणेश ठाकरे, योगेश महाजन, विशाल नागभिडे, अमोल भक्ते, संगीता निखाडे यांनी केली.