‘त्या’ आरोपीला पकडले
By admin | Published: April 2, 2015 02:34 AM2015-04-02T02:34:27+5:302015-04-02T02:34:27+5:30
कन्हान येथील रेतीमाफियांच्या गोळीबार प्रकरणातील जखमी झालेल्या आरोपीस कामठीतील रॉय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले.
कामठी : कन्हान येथील रेतीमाफियांच्या गोळीबार प्रकरणातील जखमी झालेल्या आरोपीस कामठीतील रॉय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आरोपीने तेथून पलायन केले होते. त्या आरोपीस कन्हान, कामठी व गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकाने केवळ आठ तासात नागपुरातून ताब्यात घेतले.
कन्हान शहरात २४ मार्चला रेतीमाफियांच्या दोन गटात तणाव व गोळीबार झाला होता. गोळीबारात जखमी झालेला कमलेश हरिचंद मेश्राम (३०) व तेजराम गोपाल मुळे (२५) या दोघांना कामठीतील रॉय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती केले होते. तेथे दोघांवरही शस्त्रक्रिया झाली होती.
उपचार सुरू असतानाच कमलेश हरिचंद मेश्राम याने मंगळवारी दुपारी हॉस्पिटलमधून पलायन केले. त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंत्तेवार, कन्हानचे ठाणेदार सुभाष माकोडे, अजयकुमार मालवीय, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी विविध विशेष पथक रवाना केले.दरम्यान, आरोपी कमलेश मेश्राम नागपुरात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भांडारकर, ठाणेदार सुभाष माकोडे, सहायक पोलीस निरीक्षक अजय कामळे यांच्या पथकाने सापळा रचून अवघ्या आठ तासांत आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस मंगळवारी रॉय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)