प्रत्यक्ष शस्त्र हल्ल्याशिवायही आरोपी खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:31+5:302021-09-04T04:11:31+5:30
राकेश घानोडे नागपूर : एकापेक्षा अधिक आरोपींनी समान हेतूने एखाद्या व्यक्तीचा घातक शस्त्रांनी खून केल्यास, त्यातील प्रत्यक्ष शस्त्रहल्ला न ...
राकेश घानोडे
नागपूर : एकापेक्षा अधिक आरोपींनी समान हेतूने एखाद्या व्यक्तीचा घातक शस्त्रांनी खून केल्यास, त्यातील प्रत्यक्ष शस्त्रहल्ला न करणारे आरोपीही या गुन्ह्यात दोषी ठरतात, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
वर्धा येथील वाघ्या व संदीप उके या दाेन भावांनी पिंटू सोनवणे या तरुणाचा खून केला आहे. आरोपी संदीपने स्वत:चा बचाव करण्यासाठी पिंटूवर वाघ्याने गुप्तीने वार केल्याचा मुद्दा मांडून त्याला (संदीपला) खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले जाऊ शकत नाही, असा दावा केला होता. उच्च न्यायालयाने त्याचा दावा फेटाळून लावला. पिंटूवर संदीपने गुप्तीने वार केले नाही, हे खरे आहे; परंतु वाघ्याने घरून गुप्ती आणण्यापूर्वी संदीपने पिंटूला हातबुक्क्या व लाथांनी मारहाण केली. त्याची भूमिका तेथेच संपली नाही. वाघ्या गुप्ती आणेपर्यंत तो पिंटूला मारहाण करीत राहिला. त्यानंतर त्याने पिंटूला पकडून ठेवले आणि वाघ्याने गुप्तीने वार करून पिंटूचा खून केला. त्यावरून दोघांचाही पिंटूचा खून करण्याचा हेतू होता हे सिद्ध होते. त्यामुळे संदीपने प्रत्यक्ष गुप्तीने वार केले नसतानाही तो कायद्यातील समान हेतूच्या तत्त्वानुसार खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरतो, असे उच्च न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ९ मे २०१८ रोजी सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे या आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने या निर्णयाद्वारे ते अपील फेटाळून आरोपींची शिक्षा कायम ठेवली.
-------------
अशी घडली घटना
मयत पिंटू व्यवसायाने छायाचित्रकार होता. २९ जुलै २०१५ रोजी आरोपी वाघ्या रोडवर उभा राहून शिवीगाळ करीत होता. दरम्यान, मोटारसायकलने जात असलेल्या पिंटूने वाघ्याला रस्त्याच्या बाजूला होण्यास सांगितले. त्यावरून वाघ्याने चिडून पिंटूला मोटारसायकलवरून खाली ओढले. त्यानंतर दोन्ही भावांनी त्याचा खून केला.