नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यातून गुन्हेगाराचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:26 PM2019-08-01T23:26:41+5:302019-08-01T23:28:09+5:30
एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने अजनी पोलीस ठाण्याच्या बंदिगृहातून पळ काढला. बुधवारी रात्री ही घटना घडल्याने अजनी पोलिसांत चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने अजनी पोलीस ठाण्याच्या बंदिगृहातून पळ काढला. बुधवारी रात्री ही घटना घडल्याने अजनी पोलिसांत चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. निखिल चैतराम नंदनकर (वय २७) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. तो भांडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ राहत होता.
अजनी पोलिसांनी १६ जूनला एका अल्पवयीन मुलीला पळविण्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास पाचपावलीचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक बोंडे यांच्याकडे दिला होता. आरोपी निखिल नंदनकरने तिला पळवून नेल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले, मात्र निखिल फरार झाला होता. चौकशीत निखिलने बलात्कार केल्याचे मुलीने सांगितल्यामुळे पोलिसांनी अपहरणासोबत बलात्काराचाही गुन्हा दाखल केला होता.
बुधवारी दुपारी निखिल त्याच्या घरी आल्याचे कळताच पोलिसांनी निखिलला भांडेवाडीतील त्याच्या घरून अटक केली. त्याला सायंकाळी ६.३० च्या सुमारास अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक करून ठाण्यातील बंदिगृहात टाकले. पोलीस शिपाई वनिता हिने त्याला बंदिगृहात डांबल्यानंतर घाईगडबडीत बंदिगृहाच्या दाराचा लोखंडी कोंडा भिंतीच्या कडीत टाकून त्याला कुलूप लावण्याचे टाळले. ती थोड्या वेळेसाठी बाहेर निघून गेली. बंदिगृहावर नजर ठेवण्याची जबाबदारी असणारे अन्य कर्मचारीही दुसरीकडे व्यस्त झाले. त्याचा गैरफायदा घेत निखिलने बंदिगृहाच्या दाराची सळी बाजूला सरकावली आणि बंदिगृहातून बाहेर पडून ठाण्याच्या मागच्या दाराने पळ काढला. रात्री ८.३० ला वनिता बंदिगृहाजवळ आली असता, तिला बंदिगृहात निखिल दिसून आला नाही. निखिल पळून गेल्याचे स्पष्ट झाल्याने अजनी ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या भागात पोलीस पथके पाठविण्यात आली, मात्र निखिल हाती लागला नाही.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
निखिल बेपत्ता झाल्याची माहिती ठाण्यातील वरिष्ठांना देण्यात आली. त्यामुळे वरिष्ठ धावपळ करीत ठाण्यात पोहचले. बंदिगृहावर नजर ठेवण्याची कुणाची जबाबदारी होती, अशी विचारणा करून वरिष्ठांनी त्यांची खरडपट्टी काढणे सुरू केले. परिणामी रात्रभर ठाण्यातील वातावरण गरम होते. या प्रकरणाची माहिती बाहेर जाणार नाही, यासंबंधाने काळजी घेण्याचीही सूचना देण्यात आली. निखिलच्या पलायन प्रकरणाला दडपण्याचे पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले. दुसरीकडे निखिलला पकडण्यासाठीही पोलिसांनी रात्रभर प्रयत्न केले. त्याच्या घरी, आजूबाजूला, नातेवाईकांकडे पोलीस धडकले, मात्र निखिल हाती लागला नाही. त्यामुळे हे प्रकरणही दडपण्यात पोलिसांना यश आले नाही.