धावत्या ट्रेनमधून आरोपी पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:34 AM2018-09-25T00:34:22+5:302018-09-25T00:35:47+5:30

येथून पळून गेल्यानंतर गोवा पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीने गिट्टीखदान पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा उचलत धावत्या रेल्वेगाडीतून पळ काढला. रविवारी पहाटे मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. रितिक राकेश शुक्ला(वय २०)असे फरार आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील हरिजन कॉलनीतील रहिवासी आहे.

The accused escaped from a running train | धावत्या ट्रेनमधून आरोपी पळाला

धावत्या ट्रेनमधून आरोपी पळाला

Next
ठळक मुद्देगोवा पोलिसांनी पकडले : गिट्टीखदान पोलिसांनी गमावले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथून पळून गेल्यानंतर गोवा पोलिसांनी पकडलेल्या एका आरोपीने गिट्टीखदान पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फायदा उचलत धावत्या रेल्वेगाडीतून पळ काढला. रविवारी पहाटे मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. रितिक राकेश शुक्ला(वय २०)असे फरार आरोपीचे नाव आहे. तो जरीपटक्यातील हरिजन कॉलनीतील रहिवासी आहे.
फ्लिपकार्ट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा शुक्ला ग्राहकांकडून मिळालेले १ लाख १० हजार रुपये घेऊन पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध या प्रकरणात गिट्टीखदान पोलिसांनी अफरातफरीचा गुन्हा दाखल केला होता. इकडे गिट्टीखदान पोलीस त्याचा शोध घेत होते. तिकडे तो गोव्यात पोहचला. तेथे मौजमजा केल्यानंतर त्याने दुचाकी चोरली. त्यामुळे तेथेही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. गोवा पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीनंतर नागपूर पोलिसांना कळविले. त्यामुळे शुक्लाला ताब्यात घेण्यासाठी गिट्टीखदानचे पोलीस पथक गोव्याला पोहचले. त्यात पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र इंगोले, सहायक उपनिरीक्षक राजेश लोहे तसेच नीलेश आणि आनंद नामक पोलीस शिपायांचा समावेश होता. ट्रान्झिट रिमांडच्या आधारे गोव्यातून त्याला ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पोलीस पथक मुंबईत पोहचले. तेथून विदर्भ एक्स्प्रेसने नागपूरकडे निघाले. पहाटे ३ च्या सुमारास पोलीस पेंगत असल्याचे लक्षात आल्याने आरोपी शुक्लाने बाथरूमला जायचे आहे, असे सांगून नीलेशला जागवले. नीलेशने त्याला हातकडीसह रेल्वेच्या बाथरूमकडे नेले. यावेळी रेल्वेगाडी मलकापूर स्थानकाजवळ असल्याने रेल्वेची गती मंदावली होती. शुक्लाची शरीरयष्टी हाडकुळी असल्यामुळे त्याने हातकडीतून हात काढला आणि दार उघडून धावत्या रेल्वेतून उडी मारून पळून गेला.

पोलिसांची भंबेरी उडाली
आरोपी पळून गेल्यामुळे नीलेशने आरडाओरड करून सहकाऱ्यांना जागवले. शुक्ला पळून गेल्याचे नीलेशने सांगताच त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी रेल्वेगाडी थांबवून शुक्लाची बरीच शोधाशोध केली. मात्र, अंधारामुळे तो हाती लागला नाही. त्यामुळे स्थानिक वरिष्ठांना कळवून शेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली
चार पोलिसांचे पथक असताना एक आरोपी चक्क धावत्या रेल्वेतून उडी मारून फरार होण्याचा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रकार पोलिसांच्या हलगर्जीपणाचा विषय ठरला आहे. परिणामी दोषी पोलीस पथकावर चौकशीनंतर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: The accused escaped from a running train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.