लाचप्रकरणी महिला आरेखकाविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Published: April 14, 2016 03:23 AM2016-04-14T03:23:30+5:302016-04-14T03:23:30+5:30
विहीर अधिग्रहणाचे ग्रामपंचायतीकडे थकीत असलेले बिल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच ...
भिवापूर पंचायत समितीमधील प्रकार : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
भिवापूर : विहीर अधिग्रहणाचे ग्रामपंचायतीकडे थकीत असलेले बिल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून पं.स. च्या महिला आरेखकाविरूद्ध लाचलुचपत विभागाने मंगळवारी कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या तक्रारीवरून आरेखक रूपाली आर. मरसकोल्हे यांच्याविरूद्ध भिवापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दुसरीकडे या प्रकरणातील तथ्ये उलगडल्यास आरेखकांनी लाचेची मागणी केली काय, की त्यांची फसवणूक करण्यासाठी नुसतेच या प्रकरणात त्यांना गोवण्यात आले, आदी अनेक प्रश्न पंचायत समिती आवारात चर्चिले जात आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्यादी संजय विजय गावंडे (३६, रा. पोळगाव ता. भिवापूर) यांनी तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारीनुसार, शेतातील बोअरवेल शासनाने ग्रामपंचायतच्या नळयोजनेच्या पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहीत केली. त्यासाठी मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याचे ७२ हजार ४०० रुपयांची रक्कम मंजूर करण्यासाठी आरेखक रूपाली मरसकोल्हे यांनी १० हजारांची मागणी केल्याबाबत गावंडे यांनी २१ फेब्रुवारी २०१६ रोजी केलेल्या तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ मार्चला पंचायत समितीमध्ये सापळा रचला. मात्र यावेळी महिला आरेखक कार्यालयात उपस्थित नसल्याने एसीबीची कारवाई फसली.
दरम्यान, फिर्यादी गावंडे व आरेखक रूपाली मरसकोल्हे यांच्यात पैशांच्या देवाणघेवाण बाबतचे संभाषण, १२ हजारांच्या मागणीवर १० हजार रुपयांची तडजोड आदीचे ‘व्हाईस रेकॉर्डिंग’ एसीबीच्या हाती लागल्याने मंगळवारी पुन्हा सापळा रचला. फिर्यादी संजय गावंडे हा रूपाली मरसकोल्हे यांच्याकडे गेला असता, त्यांनी ‘जे काही बिल किंवा काम असेल ते नियमानेच होईल’ असे सांगत रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा ट्रॅपिंग कारवाई फोल ठरली. अखेरीस ‘व्हाईस रेकॉर्डिंग’च्या बळावर एसीबी पथकाने रूपाली मरसकोल्हे यांच्याविरूद्ध भिवापूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याबाबत आरेखक रूपाली मरसकोल्हे यांचे मत जाणून घेतले असता, ७२ हजार ४०० रूपये मंजूर करण्यासाठी संजय गावंडे हे वारंवार फोन करून त्रास देत होते. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारीही केल्या होत्या. रक्कम मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केल्याचा माझ्यावर खोटा आरोप केला आहे. संजय गावंडे यांना पाणीपुरवठ्याचे २४ हजार रूपये मंजूर झाल्याचे पत्र यापूर्वीच पाठविले. नियमबाह्य रक्कम न वाढविल्याने गावंडे यांनी सूडबुद्धीने माझ्याविरुद्ध हा खटाटोप केला असल्याचे मरसकोल्हे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)