वन गुन्ह्यातील आरोपींना आज न्यायालयापुढे हजर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:27+5:302021-09-02T04:15:27+5:30
नागपूर : नागपूर वनविभागाने केलेल्या कारवाईतील चार आरोपींना १ सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ नखांच्या ...
नागपूर : नागपूर वनविभागाने केलेल्या कारवाईतील चार आरोपींना १ सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ नखांच्या विक्री प्रकरणातील हे आरोपी आहेत.
२९ ऑगस्टच्या कारवाईत नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वर्धा रोड टी-पाईंट पुलाजवळ रात्री १०.३० वाजता वाघाच्या नखांची विक्री होणार होती. येथे सापळा रचून ७ नखांसह महादेव आडकू टेकाम (६३, पाचगाव, ता. गोंडपिपरी) आणि गोकुळदास दिगांबर पवार (३८) यांना ताब्यात घेण्यात आले. याच घटनेतील संयुक्त कारवाईत रामचंद्र नागू आलाम (६०) आणि विजय लक्ष्मण आलाम (६५) यांनाही ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता, वाघाचे हाड, मिश्या, वाघाचे दात, वाघाच्या चामड्याचे तुकडे, मोराचे पाय व नखे, घुबडाचे पाय, सायाळचे काटे, मोरपंख, विषारी झाडांच्या बिया, साल, मूळ व खोडाचे तुकडे,
तार फासे असा मुद्देमाल हाती लागला होता. वसंता आडकू टेकाम याच्या घरूनही वन्यप्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले होते. मात्र त्यांना अर्धांगवायू झाल्याने अटक करण्यात आली नाही. या प्रकरणात पाचगाव येथील वनहक्क समितीचे सदस्यच सहभागी असल्याचे उघडकीस आले होते. यातील सर्व आरोपींना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात उभे केले जाणार आहे.
...
चार कारवाया
२९ ऑगस्टला मध्य प्रदेशमधील बिछवासाहनी येथे धाड टाकून वाघाची कातडी व पंजे यासह चार आरोपींना अटक करण्यात आली होती. यापूर्वी खवल्या मांजर प्रकरणात २४ ऑगस्टला भरमार बंदुकांसह वन्यप्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले होते. २५ व २६ तारखेच्या कारवाईमध्ये वाघाचे दात व नख विक्री प्रकरण पुढे आले होते.
...