महिला पोलिसाच्या हत्या प्रकरणातील बिहारच्या आरोपींना नागपुरात अटक; लोहमार्ग पोलिसांची कारवाई

By नरेश डोंगरे | Published: February 26, 2023 11:13 PM2023-02-26T23:13:37+5:302023-02-26T23:14:07+5:30

कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये मुसक्या आवळल्या

accused from bihar arrested in nagpur in case of murder of female police officer | महिला पोलिसाच्या हत्या प्रकरणातील बिहारच्या आरोपींना नागपुरात अटक; लोहमार्ग पोलिसांची कारवाई

महिला पोलिसाच्या हत्या प्रकरणातील बिहारच्या आरोपींना नागपुरात अटक; लोहमार्ग पोलिसांची कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : बिहारमधील एका एका महिला पोलिस शिपायाची एकतर्फी प्रेमातून हत्या करून रेल्वेने पळून जाणार्‍या आरोपींच्या नागपूर लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मो. हसन अर्शद (27), मो. सज्जाद सुफी (23), दोन्ही रा. कटीहार (बिहार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.  नागपूर रेल्वे स्थानकावर आज पहाटे ही करवाई करण्यात आली. दोन्ही आरोपींना न्यायालयाच्या आदेशाने बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

सूत्रानुसार, हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्यांची चर्चा झाल्याने कटीहार जिल्ह्यात तनावाचे वातावरण असल्याचे समजते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या कटीहार जिल्ह्यात राहणारी 21 वर्षीय महिला शिपाई आणि हसन यांच्यात मैत्री होती. मात्र काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. तेव्हापासून युवतीने मैत्री तोडली. मात्र, हसन तिला त्रास देत होता. यावादातून त्याने सहा साथीदारांच्या मदतीने कोढा क्षेत्र भटवारा पंचायत जवळ महिला शिपायावर गोळीबार करून खून केला. या प्रकरणी कोडा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. मात्र, हसन आणि सज्जाद पळून जाण्यात यशस्वी झाले.

दोघेही 12650 कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या एस-4 कोचमधून दिल्ली ते बेंगळुरू प्रवास करीत असल्याची गुप्त माहिती बिहारचे पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यांना मिळाली.  त्यांनी नागपूर लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्याशी संपर्क साधला तसेच त्यांच्या मोबाईलवर दोघांचेही छायाचित्र पाठविले. काशिद यांनी लगेच पथकातील सदस्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर छायाचित्रासह माहिती पाठविली. लोहमार्ग पोलिसांचे पथक संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या प्रतिक्षेत होते. पहाटे 3 वाजताच्या सुमारास गाडी नागपूर स्थानकावर पोहोचली. यावेळी पथकातील सदस्य पोलिस उपनिरीक्षक तायवाडे, वघारे, सतीश बुरडे, बबन धोगंडी यांच्यासह आरपीएफ जवानांनी गाडीचा ताबा घेतला. प्रत्येक डब्याची झडती घेत असताना एस-4 कोचमधील 1 आणि 2 नंबरच्या बर्थवर संशयीत युवकांची चौकशी केली. छायाचित्र तपासले असता त्याच्यात समानता वाटल्याने दोघांनाही ताब्यात घेवून ठाण्यात आणले. चौकशीअंती महिला पोलिस शिपायाची हत्या करून पळून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

काशिद यांनी लगेच ही माहिती बिहारचे पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यांना दिली. त्यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक राघवेंद्र कुमार सिंग, पोलिस उपनिरीक्षक रूपक रंजन सिंग दोघेही विमानाने नागपुरात पोहोचले. काशीद यांनी न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही आरोपींना बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: accused from bihar arrested in nagpur in case of murder of female police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.