आरोपीला सात वर्षे कारावास
By admin | Published: May 24, 2017 02:41 AM2017-05-24T02:41:57+5:302017-05-24T02:41:57+5:30
जरीपटका हद्दीतील एका १३ वर्षीय मुलावरील अत्याचारप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या
सत्र न्यायालय : बालकावरील अत्याचार प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटका हद्दीतील एका १३ वर्षीय मुलावरील अत्याचारप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने एका आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये पीडित मुलाला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
दिलीप जगलाल वरखेडे (२७) असे आरोपीचे नाव असून, तो काटोल तालुक्यातील मेटपांजरा येथील मूळ रहिवासी आहे. तो भंगार व्यवसायी असून, पीडित मुलाच्या मोहल्ल्यात राहत होता.
आरोपीला भादंविच्या ३२३ कलमांतर्गत सहा महिने सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड, भादंविच्या ३६३ कलमांतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड, भादंविच्या ३७७ कलतमांतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड, लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याच्या कलम ४ अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. आरोपीला या सर्व शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, २३ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास पीडित मुलाला त्याच्या वडिलांनी दुकानात झंडू बाम विकत घेण्यासाठी पाठविले होते. तो आपल्या भावासोबत दुकानात गेला होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याचा भाऊ एकटाच झंडू बामची बाटली आणि सुटे पैसे घेऊन घरी परतला असता वडिलांनी त्याला पीडित मुलाबाबत विचारले. तो मागून येत असल्याचे त्याने सांगितले होते. रात्री ८.१३ वाजताच्या सुमारास वडिलांना यादव, असे नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन करून सांगितले की, तुमचा मुलगा कामठी मिलिटरी छावणीमागील हनुमान मंदिराजवळ आढळला असून, तुमच्या मुलासोबत एका इसमाने गैरकृत्य केले आहे. नाका नंबर २ वर त्याला घेण्यास या, असेही या व्यक्तीने सांगितले होते.
वडिलांनी तातडीने नाक्यावर जाऊन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आरोपीने पीडित मुलाला आपल्या मोटरसायकलवर बसवून मिलिटरी छावणीमागील जंगलात नेऊन गैरकृत्य केले होते. आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा गळा दाबून त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. पीडित मुलगा त्याच्या तावडीतून निसटून पळून जाऊन मिलिटरी छावणीजवळील हनुमान मंदिराकडे धावत जाऊन त्याने स्वत:चा बचाव केला होता.
वडिलाने नाका नंबर दोन गाठून मुलाला आपल्या ताब्यात घेतले होते. वडिलाने केलेल्या चौकशीत त्याने असे सांगितले होते की, आरोपीने त्याला खिडक्या आणलेल्या आहेत, त्या उचलण्यासाठी चल, अशी थाप मारून आपल्या मोटरसायकलवर बसवून नेले होते. पीडित मुलाच्या वडिलाने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलिसांनी २४ फेब्रुवारी २०१४ रोजी गुन्हा दाखल करून आरोपीला ८ मार्च २०१४ रोजी अटक केली होती. पोलीस निरीक्षक बी. पी. सावंत यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने आरोपीला ही शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील वर्षा आगलावे तर आरोपीच्या वतीने अॅड. व्ही. डब्ल्यू. मेश्राम यांनी काम पाहिले. सहायक फौजदार रज्जाक शेख, हेड कॉन्स्टेबल रविकिरण भास्करवार, नायक पोलीस शिपाई श्याम नन्हे, अनिल पोतराज यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.