बल्लारपुरातील पेट्रोलबॉम्ब हल्ला प्रकरणातील आरोपीला नागपुरातून अटक

By योगेश पांडे | Published: July 24, 2024 03:20 PM2024-07-24T15:20:59+5:302024-07-24T15:26:00+5:30

Nagpur : कपडा व्यापाऱ्यावर केला होता हल्ला

Accused in Ballarpur petrol bomb attack case arrested from Nagpur | बल्लारपुरातील पेट्रोलबॉम्ब हल्ला प्रकरणातील आरोपीला नागपुरातून अटक

Accused in Ballarpur petrol bomb attack case arrested from Nagpur

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरातील कपडा व्यापाऱ्यावर पेट्रोलबॉम्ब फेकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे. आरोपी कारने नागपुरात पोहोचला होता. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.

७ जुलै रोजी कपडा व्यापारी अभिषेक मालू यांच्या गांधी चौकातील दुकानात तीन आरोपींनी पेट्रोलबॉम्बने हल्ला केला होता. सकाळच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात मालू यांच्या दुकानातील कर्मचारी कार्तिक साखरकर हा जखमी झाला होता. या प्रकरणामुळे बल्लारपुरातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष होता व पोलिसांनी आरोपींना अटक करावी अशी मागणीदेखील करण्यात आली होती. विशेष म्हणजे वर्षभराअगोदर ते दुकान जाळण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला होता. तर हल्ल्याच्या दोन आठवड्यांअगोदर काही लोकांनी तेथे राडा घालण्याचा कटदेखील रचला होता. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो उधळला गेला होता.

या प्रकरणातील एक आरोपी नीरज संतोष गुप्ता (२६, श्रीराम वॉर्ड, गांधी चौक) हा नागपुरात लपला होता. पांढऱ्या रंगाच्या डस्टर या कारने तो नागपुरात पोहोचला होता. गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत सोफीया नावाची महिला सापडली. ती महिला जून महिन्यात पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली होती. त्यासंदर्भात तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. गुप्ताला बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमप्रकरणातून गुप्ताने हा हल्ला केला होता.

Web Title: Accused in Ballarpur petrol bomb attack case arrested from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.