सोन्याच्या बिस्कीटांच्या चोरीतील आरोपी गजाआड

By योगेश पांडे | Published: May 24, 2023 06:05 PM2023-05-24T18:05:12+5:302023-05-24T18:05:41+5:30

Nagpur News ३० तोळे वजनाची सोन्याच्या बिस्कीटांसह ३० लाखांहून अधिक रकमेच्या घरफोडीतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Accused in theft of gold biscuits arrested | सोन्याच्या बिस्कीटांच्या चोरीतील आरोपी गजाआड

सोन्याच्या बिस्कीटांच्या चोरीतील आरोपी गजाआड

googlenewsNext

योगेश पांडे 
नागपूर : ३० तोळे वजनाची सोन्याच्या बिस्कीटांसह ३० लाखांहून अधिक रकमेच्या घरफोडीतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घरफोडी झाली होती.

केटीनगर येथे राहणारे हेमंत शरद पांडे हे डब्लूसीएलमध्ये महाव्यवस्थापक आहेत. ते छत्तीसगडमधील रायगड येथे कार्यरत आहेत. पांडे यांच्या पत्नी आपल्या मुलीसह पतीला भेटण्यासाठी रायगडला गेल्या होत्या. दरम्यान, १९ मे रोजी पहाटे अज्ञात आरोपींनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेली एकूण ३०० ग्रॅम वजनाची सोन्याची तीन बिस्किटे, ४० ग्रॅम वजनाची सोन्याची चार नाणी व २१ हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच पांडे नागपुरात परतले. सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांनी तक्रार दाखल केली.

गिट्टीखदान पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मानकापूर पोलिसांसोबतच गुन्हे शाखेचे पथकदेखील समांतर तपास करत होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू केला. फुटेजमध्ये दिसलेला व्यक्ती हा पुढे मनसर कांद्रीकडे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासातून स्पष्ट झाले. पोलिसांनी मनसर कांद्री रेल्वे लाईन परिसरात सापळा रचून अनिकेत निळकंठ वाढीवे (२४) याला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

त्याने २१ हजारातून ९ हजार रुपये खर्च केले होते. उर्वरित ३०.४९ लाखांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. त्याला गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, सहायक पोलीस आयुक्त मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश सागडे,पवन मोरे, मधुकर कोठाके, बलराम झाडोकर, सतिश पांडे, दशरथ मिश्रा, मुकेश राऊत, रविंद्र सावरकर, आनंद काळे, मिलींद चौधरी, विशाल रोकडे, जितेश शेट्टी, दीपक लाकडे, रविंद्र करदाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Accused in theft of gold biscuits arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.