उत्तर प्रदेशातील आरोपी! नागपुरात चोरी, मध्य प्रदेशात अटक; 'चोरावर मोर'
By नरेश डोंगरे | Published: July 4, 2024 07:58 PM2024-07-04T19:58:50+5:302024-07-04T19:59:00+5:30
आरपीएफची प्रशंसनीय कामगिरी; चोरटा रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
नागपूर: उत्तर प्रदेशातील एक चोरटा नागपुरात येतो. संधी मिळताच चोरी करतो. त्याची तक्रार मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान धावपळ करतात आणि त्याला मध्य प्रदेशात अटक करून नागपुरात आणले जाते. 'चोरावर मोर', ही म्हण सार्थ करणारी ही घटना रेल्वे स्थानकावर घडली असून प्रवीण कुमार सूरजमल (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. यूपीच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवारी असलेला आरोपी प्रवीण सराईत चोरटा आहे. दोन दिवसांपूर्वी तो नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचला. येथे त्याने सावज शोधायला सुुरूवात केली. संधी मिळताच वेटिंग हॉलमधील एका प्रवाशाचा मोबाईल उचलून पळ काढला. आरपीएफच्या पथकाला या चोरीची माहिती कळताच त्यांनी चोरट्याचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात चोरटा १६३१७ हिमसागर एक्सप्रेसच्या जनरल डब्यात चढून भोपाळकडे जाताना दिसला.
आरपीएफने गाडीचे लोकेशन काढून ती भोपाळला पोहचणार असल्याचे लक्षात येताच तेथील आरपीएफच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. आरोपीचे सीसीटीव्हीमधील फोटोही पाठविले. त्यावरून भोपाळ आरपीएफने संशयीत आरोपीला भोपाळ स्थानकावर गाडी थांबताच ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता फिर्यादीच्या वर्णनाचा मोबाईल त्याच्याकडे आढळला. तो नागपूर रेल्वे स्थानकाच्या वेटिंग हॉलमधून चोरल्याची कबुली प्रवीणने दिली.
त्यामुळे भोपाळच्या अधिकाऱ्यांनी नागपूरच्या आरपीएफ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार बैतुल, इटारसीच्या पथकाला तिकडे रवाना करण्यात आले. हे पथक आरोपी प्रवीणला घेऊन नागपुरात पोहचले. बुधवारी त्याची चाैकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मध्य रेल्वे आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार, सहायक सुरक्षा आयुक्त कुमार कुरूप यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.