‘जेल ब्रेक’चा आरोपी अडकला

By admin | Published: April 17, 2016 02:43 AM2016-04-17T02:43:34+5:302016-04-17T02:43:34+5:30

मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून पळून जाणारा आणि गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत फिरणारा खतरनाक गुन्हेगार बिसेनसिंग रम्मूलाल उईके ...

The accused of 'Jail Break' escaped unhurt | ‘जेल ब्रेक’चा आरोपी अडकला

‘जेल ब्रेक’चा आरोपी अडकला

Next

नागपूर : मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून पळून जाणारा आणि गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत फिरणारा खतरनाक गुन्हेगार बिसेनसिंग रम्मूलाल उईके (वय ३५) याला गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी जेरबंद केले. शिवनी जिल्ह्यातील घनसोर जवळच्या धुमामाळ (मध्य प्रदेश) मध्ये जाऊन गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आज रात्री पत्रकारांना ही माहिती दिली.

३१ मार्च २०१५ च्या पहाटे मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था भेदून कुख्यात सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (वय २५,रा. कामठी रोड), मोहम्मद सोहेल खान ऊर्फ शिबू सलीम खान (वय २४, रा. मानकापूर), बिसेनसिंग उईके, प्रेम ऊर्फ नेपाळी शालिकराम खत्री (वय २१,रा. नवलप्राशी, रामग्राम संतपूर, नेपाळ) आणि आकाश ऊर्फ गोलू रज्जूसिंग ठाकूर (वय २२, रा. कुतूबशहानगर, गिट्टीखदान) हे पळून गेले होते. या ‘जेल ब्रेक’ प्रकरणाने सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणात पाच अधिकाऱ्यांसह कारागृहातील एकूण ११ जण निलंबित आणि एक कर्मचारी बडतर्फ झाला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने शिबू आणि प्रेम नेपाळीला १४ मे २०१५ ला अटक केली होती. त्यानंतर गोलू ठाकूरला पांढुरण्यात पकडले होते. सत्येंद्र गुप्ताला १२ जुलैला अटक करण्यात आली होती तर बिसेनसिंग पोलिसांना गुंगारा देत होता.
तो पोलिसांच्या हाती लागत नसल्याने बिसेन पोलिसांना सापडणार की नाही, असा प्रश्न वारंवार पोलिसांना विचारला जात होता. दरम्यान, बिसेनने आपल्या परिवाराशी संपर्क वाढविल्याचे आणि तो एक-दोनदा गावात येऊन गेल्याचे कळाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या गावावर तीन महिन्यांपूर्वीपासून नजर रोखली होती. किमान ३० ते ४० वेळा पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी जाऊन आले होते. मात्र, प्रत्येक वेळी तो गुंगारा देत निसटून जायचा. त्यामुळे त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर ढोले आणि सहायक निरीक्षक प्रदीप अतुलकर यांच्या नेतृत्वात दोन पोलीस पथके बिसेनच्या मुसक्या आवळण्यासाठी नेमण्यात आली. तो गावात आल्याचे कळताच गुरुवारी रात्री ही पथके बिसेनच्या गावाशेजारी पोहचली. शुक्रवारी अंधार पडताच त्याच्या घराला गराडा घालण्यात आला आणि एकसाथ पोलिसांनी बिसेनवर झडप घातली. पकडले जाणार हे लक्षात येताच बिसेनने धारदार चाकू काढून पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

बिसेन राजा गौस टोळीचा सदस्य
कुख्यात बिसेन कमालीचा शातीर आहे. तो कुख्यात राजा गौस टोळीचा सदस्य आहे. पळून गेल्यानंतरही त्याने अनेक गुन्हे केल्याची माहिती आहे. त्याचा अहवाल पोलीस गोळा करीत आहेत. पोलिसांच्या कारवाईपासून दूर राहण्यासाठी तो घराऐवजी जंगलात दडून बसायचा. त्यामुळे तीन महिन्यात ३० ते ४० वेळा पोलीस त्याला पकडायला गेली अन् रिकाम्या हाताने परतली. तो जंगलात दडून बसतो, हे ध्यानात घेऊन त्या तयारीनेच शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याला जेरबंद करण्याची योजना बनविली. त्याच्याकडे नेहमी शस्त्र असते आणि तो हल्लाही करू शकतो, हे लक्षात ठेवूनच पोलिसांनी त्याच्या अटकेची योजना तयार केली होती, त्याला यश मिळाले.

Web Title: The accused of 'Jail Break' escaped unhurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.